Ticker

6/Breaking/ticker-posts

'वारीला बंदी, बार मात्र जोमात सुरु' ; ठाण्यातील डान्सबारला कुणाचा वरदहस्त ?

 *उत्पादन शुल्क विभागातील चौघे निलंबित.

*ठाण्यातील डान्स बार प्रकरणी कारवाई.

*दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही झाली कारवाई.







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 ठाणे: ठाण्यात करोना नियमांचे उल्लंघन करून डान्स बार सुरू ठेवण्याच्या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर आता उत्पादन शुल्क विभागातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन दुय्यम निरीक्षक आणि दोन जवानांचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.


करोना नियंत्रणात आणण्यासाठी अद्यापही निर्बंध लागू आाहेत. या निर्बंधानुसार दुकानासह इतरही आस्थापनांसाठी ठराविक वेळ निर्धारित केली आहे. मात्र या वेळेनंतरही ठाणे शहरात डान्स बार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून दोन सहायक पोलीस आयुक्तांची बदली केली. त्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनानेही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील १५ लेडीज बारना टाळे ठोकले. या सर्व घडामोडीनंतर उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि प्रदीपकुमार सरजिने, तसेच जवान ज्योतिबा पाटील, सुरेंद्र म्हस्के यांना निलंबित करण्यात आले आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?

करोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करून ठाण्यातील काही डान्स बार सुरू असल्याबाबत एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त जयजीत सिंग  यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांना दिले व या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना निलंबित केले.

 त्याचवेळी नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तसेच संबधित आर्केस्ट्रा बार अँड रेस्टोरंटवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या बरोबरच ठाणे महापालिकेसही हे आर्केस्ट्रा बार अँड रेस्टोरंट सील करण्याविषयी कळवण्यात आले होते. त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी कठोर पाऊल उचलत शहरातील १५ बार सील केले आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या