Ticker

6/Breaking/ticker-posts

'मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमारांच्या घरी जायला वेळ आहे, स्वप्नील लोणकरच्या नाही'

 


लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं बुधवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. अनेक मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या भेटीचा फोटो ट्वीट करत भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.


नीतेश राणे यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ' राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळं जीव गमवाव्या लागलेल्या स्वप्नील लोणकरच्या आईला भेटण्यासाठी मुख्यमंत्री गेले असते तर बरं झालं असतं. पण त्यांना तिकडं जायला वेळ मिळाला नाही. दिलीप कुमार यांच्या घरी जाण्यास मात्र त्यांना वेळ मिळाला. कटू आहे पण सत्य आहे,' असं नीतेश राणे यांनी म्हटलं आहे.

 

राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्यामुळं आणि नोकरी मिळत नसल्यामुळं आलेल्या नैराश्यातून स्वप्नील लोणकर या तरुणानं नुकतीच आत्महत्या केली. स्वप्नील हा एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, दीड वर्षांपासून त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यानंतर २०२० मध्ये सुद्धा त्यानं एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, करोनामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. हे सगळं कधी होणार आणि नोकरी कधी मिळणार? या तणावातून त्यानं २९ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या मायाजालात अडकू नका, असं आवाहनही त्यानं सुसाइड नोटमधून केलं होतं.

स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. तरुण वर्गामध्ये प्रचंड असंतोष होता. याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची घोषणा विधानसभेत केली. मात्र, सरकारमधील कुठल्याही मंत्र्यानं लोणकर कुटुंबीयांची भेट घेतली नव्हती. त्यावरून नीतेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या