Ticker

6/Breaking/ticker-posts

महिला पोलिस उपायुक्तांच फुकट बिर्याणी प्रकरण, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पुणे: एसपी हॉटेलची बिर्याणी फुकट खाण्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पुण्यातील पोलिस महिला उपायुक्तांची अडचणीत आल्या आहेत. एसपी हॉटेलमधून आवडीची चविष्ट बिर्याणी आणण्याचे आपल्या पोलिस कर्मचाऱ्याला आदेश देताना आपल्याच हद्दीतील हॉटेलला पैसे कशाला द्यायचे असे सांगत बिर्याणी फुकट आणण्याचे आदेश महिला आयुक्तांनी दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.

प्रियंका नारनवरे असे महिला पोलिस उपायुक्तांचे नाव असून त्यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्याला मटण बिर्याणी आणि प्राँझ फ्राय आणायला सांगितले असे व्हायरल क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. आपण ऑर्डर पैसे देऊन घेतो असे हा पोलिस कर्मतारी नारनवरे यांना सांगत आहे. मात्र आपल्याच हद्दीत येणाऱ्या हॉटेलला पैसे कशासाठी द्यायचे, असे सांगून उपायुक्त नारनवरे या पोलिस कर्मचाऱ्याला बिर्याणी आणि प्रॉंझ फ्राय फुकट आणण्याचा आदेश देत असल्याचे या व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

ही गंभीर बाब, चौकशी तर होणारच- गृहमंत्री

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मी सुद्धा ही क्लिप ऐकली असून ही गोष्ट गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आपण पुणे पोलिस आयुक्तांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार त्यावर योग्य तो निर्णय घेईल, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

माझ्या विरोधात रचलेले हे षडयंत्र- प्रियंका नारनवरे
दरम्यान, पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी या क्लिपमधील पूर्ण आवाज आपला नसल्याचे एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या क्लिपमध्ये मॉर्फिंग केले असल्याचे नारनवरे यांचे म्हणणे आहे. काही हफ्तेखोर पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात मी पावले उचलल्यामुळे माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्यात आल्याचा नारनवरे याचा आरोप आहे. सध्या बदल्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांच्या हितसंबंधांच्या आड आल्याने काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मिळून मला येथून दुसरीकडे बदली करून पाठवण्याच्या प्रयत्नांत आहेत, असा आरोपही नारनवरे यांनी केला आहे. या प्रकरणीची चौकशी झालीच पाहिजे, यातूनच सत्य बाहेर येईल असेही त्या म्हणाल्या.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या