लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबईः राज्य
सरकारने २० सनदी अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या केल्या आहेत. पावसाळी अधिवेशन
झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचे
ठरविल्याचे यावरुन स्पष्ट होते. मंत्रालयातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान
सचिव ओ. पी. गुप्ता यांची बदली वित्त विभागात प्रधान सचिव व्यय म्हणजेच
एक्सपेंडिचर या पदावर करण्यात आली आहे.
सामान्य
प्रशासन विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांना मंत्रालयातच उच्च व तंत्र
शिक्षण विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
नवी मुंबईतील एकात्मिक बाल विकास योजनेच्या
आयुक्त इंद्रा मालो यांना सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव पदावर नेमण्यात आले
आहे. सामान्य प्रशासनचे सहसचिव अजित पाटील यांची मुंबई एमआयडीसीत सह मुख्य
कार्यकारी अधिकारी या पदावर बदली झाली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांना मुंबईत वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागात सहसचिव करण्यात आले आहे. रुचेश
जयवंशी यांची बदली पुण्यात महिला व बाल कल्याण आयुक्त या पदावर झाली असून, संजय यादव यांना मुंबई एमआयडीसीत
सहव्यवस्थापकीय संचालक या पदावर नेमण्यात आले आहे.
अमरावतीचे
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची बदली मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात उपसचिव या
पदावर करण्यात आली. आर. एच. ठाकरे यांना नागपूरमध्ये अतिरिक्त आदिवासी आयुक्त, अकोल्याचे जिल्हाधिकारी जे. एस. पापळकर यांना
अकोला महापालिका आयुक्तपदी नेमण्यात आले. जी. एम. बोडके यांची बदली हिंगोलीचे
जिल्हाधिकारी तर राहुल अशोक रेखावार यांची नियुक्ती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी या
पदावर करण्यात आली. जालनाचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांना पुणे महापालिकेत
अतिरिक्त आयुक्त या पदावर आणण्यात आले आहे. दीपक कुमार मीना यांना नागपूर
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पवनीत कौर यांना अमरावतीच्या
जिल्हाधिकारी, विजय चंद्रकांत राठोड यांना जालना
जिल्हाधिकारी, नीमा अरोरा यांना अकोला जिल्हाधिकारी, आंचल गोयल यांना परभणीच्या जिल्हाधिकारी तर डॉ. बी. एन. पाटील यांना
कोकणात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या पदावर नेमणूक देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या