Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात निर्बंध शिथील होणार का?; ठाकरे सरकारने घेतला 'हा' निर्णय

 *तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत दोन डोस घेतलेल्यांनाच आता राज्यात प्रवेश.

*राज्यात सध्याचे निर्बंध यापुढेही कायम राहणार.






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला असून राज्यातील रुग्णसंख्याही अद्याप तितकीशी कमी झालेली नाही. त्यामुळेच कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसून आहेत ते  निर्बंध कायम राहणार आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. देशात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. देशाच्या तुलनेत सध्या महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा दर कमी असला तरी पुढील संभाव्य धोका लक्षात घेता आपल्याला सावधपणानेच पुढे जावे लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता कोविड विषयक जे नियम आणि निर्बंध आहेत त्यात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. लसीकरणाचा वेग चांगला असला तरी तो आणखी वाढवण्यावर आमचा भर आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात राज्याला सव्वाचार कोटी लस मिळणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करता यावा यासाठी आणखी एक हजार डॉक्टर्सची भरती करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात त्याची जाहिरात निघेल, असे त्यांनी सांगितलं.

इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे लसचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे, असे टोपे यांनी सांगितले. यापूर्वी राज्यात प्रवेश देताना आरटीपीसीआर  चाचणीचा अहवाल पाहिला जात होता मात्र आता करोनाच्या दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच राज्यात प्रवेश दिला जाईल, असे टोपे म्हणाले. राज्यातील ९२ टक्के रुग्ण दहा जिल्ह्यांमध्ये आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे रुग्ण अधिक आहेत, असेही टोपे यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या