लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन महिने
करोनाचा कहर सुरू आहे. रोज दीड हजारावर नवे रुग्ण आढळत आहेत. याशिवाय रोज पंचवीस
ते तीस जणांचा करोनाने मृत्यू होत आहे. पॉझिटिव्हिटी दरही दहा टक्केपेक्षा अधिक
असल्याने कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यात होता. यामुळे केवळ अत्यावश्यक दुकाने
उघडण्यास परवानगी होती. तीन महिने दुकाने बंद असल्याने आर्थिक अडचणींचा डोंगर उभा
राहिल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास परवानगी मागितली पण प्रशासनाने
त्यास नकार दिला होता. दुकाने उघडल्यास कारवाई करण्याची भूमिका घेतल्याने वादावादी
होत होती.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी व्यापाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निर्बंध हटविण्याची मागणी केली होती. त्यांनी प्रथम दुकाने उघडण्यास परवानगी दिली,
नंतर आपला निर्णय मागे घेतला. यामुळे गोंधळ आणखी वाढला होता. अखेर
प्रशासनाने शनिवारी नवीन आदेश काढत सोमवारपासून दुकाने उघडण्यास परवानगी दिली.
सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी
दिल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेले
दोन महिने रोज दीड हजार करोना बाधित आढळत असताना शनिवारी हा आकडा हजाराच्या आत
आला. शिवाय मृतांचा आकडाही वीसपेक्षा कमी आला असून करोनामुळे अठरा जणांचा बळी
गेला.
0 टिप्पण्या