*खूनाचा उलगडा करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शिर्डी: शिर्डीत बांधकामावर मजुरी करणाऱ्या
राजेंद्र आंतवन धिवर याचा २९ जूनला भर रस्त्यात खून झाला होता. या खून प्रकरणाचा
उलगडा करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. शिर्डीतील
पान-फुल विक्रेता अमोल सालोमन लोंढे याने ४ लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून
आणल्याचे निष्पन्न झालं आहे. धिवर आणि लोंढे यांचे गेल्या दहा-बारा वर्षांपासून
वाद असून पोलिसांत तक्रार देऊनही फारसा उपयोग न झाल्याने लोंढे याने एका
मित्राच्या ओळखीने नाशिकमधील आरोपींना सुपारी देऊन ही हत्या घडवल्याचे उघड झाले.
पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याची उकल
कशी झाली, याची माहिती दिली.
संजय मधुकर पवार आणि त्यांच्या मामाचा मुलगा राजेंद्र धिवर बांधकामावर सेंट्रींग
मजूर म्हणून काम करतात. २९ जूनला सायंकाळी ते काम संपवून सायकलवर घरी निघाले होते.
थकल्यामुळे रस्त्यात एका ठिकाणी थांबले. तेवढ्यात दोन दुचाकींवरून चार जण तेथे
आले. त्यांनी धिवर याला बोलावून त्याच्याकडे काडीपेटीची मागणी केली. त्याच्याशी
वाद घालून काही कळायच्या आतच धारदार हत्याराने धिवर याच्यावर वार केले. यामध्ये
धिवर याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले
याप्रकरणी शिर्डी पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल
कटके आणि त्यांचे सहकारी या गुन्ह्याचा तपास करीत होते. आरोपींना कोणताही पुरावा
मागे सोडला नव्हता. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेऊन तपास सुरू केला. काही ठिकाणी
पोलिसांना संशयित आरोपींचं फुटेज मिळालं. मात्र, ते अस्पष्ट होते. प्रयत्न करून पोलिसांनी त्यातून वाहनांचे नंबर शोधून
काढले. अशी चाळीस ठिकाणची फुटेज मिळविण्यात आली.
तांत्रिक मदतीने नंबर आणि त्यावरून आरोपींचा मार्ग
शोधला असता ते नाशिककडे गेल्याचे आढळून आले. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या मदतीने
आरोपींची माहिती मिळविण्यात आली. त्यातून राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे (वय १९, सुखदेव नगर, नाशिक)
व अविनाश प्रल्हाद सावंत (वय १९ रा. पाथर्डी गाव, नाशिक)
यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आणखी
साथीदारांची नावे सांगितली. त्यांच्याकडून हा गुन्हा अमोल लोंढे याच्या
सांगण्यावरुन केला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी पान-फुल
विक्रेता अमोल सालोमन लोढे (वय ३२, रा. शिर्डी) यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर गुन्ह्याची
उकल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की, यातील मृत धिवर व
लोंढे यांच्यात जुने वाद आहेत. धिवर हा लोंढे याला विविध माध्यमातून त्रास देत
होता. त्यामुळे २०१३ मध्ये लोंढे याने शिर्डी पोलिसांकडे तक्रारही केली होती.
मात्र, तरीही त्रास सुरूच राहिला. त्यामुळे मित्र अरविंद
सोनवणे (रा. शिर्डी) याच्या ओळखीने राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे व त्याच्या
साथीदारांना ४ लाख रुपयांची सुपारी देऊन राजेंद्र धिवर याचा खून करण्यास सांगितले.
पोलिसांनी सोनवणे यालाही अटक केली. खून करण्यासाठी ज्यांना सुपारी दिली तो नाशिकचा
उबाळे व सावंत यांच्याविरुद्ध यापूर्वी नाशिकमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलिस अधीक्षक
दिपाली काळे, उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पोलिस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने
ही कामगिरी केली.
0 टिप्पण्या