Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजपची अडचण वाढली; राजीनामासत्रामुळे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची गोची

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यामुळे पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे पहायला मिळते. राजीनामे देणारे कार्यकर्ते आता वरिष्ठांच्याही राजीनामाची मागणी करत आहेत. तर याबद्दल काय भूमिका घ्यावी, हे पक्षाकडून आणि मुंडे यांच्याकडूनही अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने त्यांनी शांत राहणेच पसंत केले आहे.

बीडनंतर नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव व नेवासा तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० जणांनी आतापर्यंत राजीनामे दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यापैकी कोणीही मोठ्या पदावर नाही अगर लोकप्रतिनिधीत्वाचा रितसर राजीनामा दिलेले नाही. बहुतेकांनी आपले राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे दिले आहेत.

यासोबत आता ज्यांनी राजीनामे दिले, त्यांनी इतरांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे. त्यावरून सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्ष मुंडे यांचाही राजीनामा मागण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष मुंडे आपण नेमके कोणाचे समर्थक आहोत, हे जाहीर करावे. मुंडे यांचे समर्थक असाल तर तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.

यासंबंधी जिल्हाध्यक्ष मुंडे म्हणाले, ‘मुळात या विषयावर खासदार मुंडे किंवा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण नाराज असल्याचे म्हटलेले नाही. शिवाय त्यांनी कोणालाही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. जे कार्यकर्ते राजीनामे देत आहेत, ते त्यांच्या भावना या माध्यमातून व्यक्त करीत आहेत. त्यांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घ्यायचा हे पक्षाकडून अगर मुंडे यांच्याकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. मुंबईतील बैठकीनंतर यावर काय तो निर्णय होऊ शकेल.

तर दुसरीकडे राजीनामे देणाऱ्यांवरही टीका होऊ लागली आहे. हे केवळ दबाव तंत्र आहे. त्यांना राजीनामे द्यायचेच असतील तर पक्षाकडे नव्हे तर संबंधित सरकारी यंत्रणेकडे द्यावेत. कार्यकर्ते राजीनामे देत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी का देत नाहीत? तीन तालुके वगळता इतरत्र असलेल्या भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे? असे प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले आहेत. मुळात वरिष्ठ पातळीवर मुंडे आणि पक्ष यांनीही एकमेकांबद्दल आपल्या भूमिका स्पष्ट केल्या नाहीत. त्यामुळे भाजपचे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे पहायला मिळते आहे.

पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर डॉ. कराड यांचं ट्वीट

भागवत कराड यांनी सोमवारी एक ट्विट केलं आहे. पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळं झालं. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो. मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाण शुभेच्छा दिल्या, असं भागवत कराड यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे व भागवत कराड यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याचं समोर येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या