*बच्चू कडू यांच्या पक्षाची केंद्र व
राज्य सरकारकडे मागणी.
*मागणी
मान्य न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा.
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: लोकलमध्ये प्रवेशबंदी असल्याने
मुंबई व उपनगरात राहणाऱ्या नोकरदार वर्गाची तसेच हातावर पोट असणाऱ्या वर्गाची होत
असलेली कुचंबणा लक्षात घेऊन मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा
घेतला आहे. कोविड वरील लसचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास
करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र
मोदी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे आणि रेल्वेमंत्री पीयुष गोयल
यांच्याकडे करण्यात आली असून ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात
आला आहे.
जवळपास दीड
वर्षे करोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भारतात लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू आहेत.
या काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प
झाले. काहींच्या घरचे जबाबदार आणि कर्ते स्त्री-पुरुष यांचा बळी करोनाने घेतला.
आता कोविडवर लस आली आहे आणि आपल्या देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणही युद्धपातळीवर
सुरू आहे. ही बाब लक्षात घेता ज्या नागरिकांनी कोविडवरील दोन्ही डोस घेतले आहेत,
त्यांना कामानिमित्त लोकल प्रवासाची मुभा दिली गेली पाहिजे, असे या कडू यांच्या पक्षाने म्हटले आहे.
मुंबईची
लोकल रेल्वे ही प्रवाशांना परवडणारी सेवा आहे. या सेवेवर नोकरदार आणि अन्य वर्ग
पूर्णपणे अवलंबून आहे. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल रेल्वे खासगी
कर्मचारी व कष्टकरी नागरिकांना नाकारली गेल्याने त्यांचे जीवनमान एकप्रकारे ठप्प
झाले आहे, तसेच बससेवेवरही प्रचंड ताण येत असून सर्वसामान्य
चाकरमान्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. बसमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे
करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याचीही भीती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर
गंभीरपणे लोकलसेवेचा विचार व्हावा अशी विनंती करण्यात आली आहे.
प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे नोकऱ्या, कामधंदा तर गेलाच आहे शिवाय लोकांचे
मानसिक स्वास्थ्यही बिघडले आहे. आर्थिक विवंचनेमुळे असंख्य लोक सध्या तणावाखाली
वावरत आहे. आगामी काळात हे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे सर्वंकष विचार करून ही
कोंडी फोडली पाहिजे. लसचे दोन डोस घेतल्यानंतर जर विमान प्रवासाला परवानगी मिळत
असेल तर तोच निकष लोकल रेल्वेबाबत का लावला जात नाही, असा
सवाल प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आला असून लोकल सेवा सामान्यांसाठी खुली
केली गेली नाही तर आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा
पक्षाचे प्रवक्ते मनोज टेकाडे आणि संपर्कप्रमुख अजय तापकीर यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या