Ticker

6/Breaking/ticker-posts

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपदी कोण?; 'या' महिला आमदाराचं नाव आघाडीवर

 *विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे.

*आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव सर्वात आघाडीवर.








लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

पंढरपूर: महामंडळ वाटपात अवघ्या वारकरी संप्रदायाचे दैवत असलेले विठ्ठल मंदिर काँग्रेस पक्षाकडे गेल्याने आता मंदिर समितीचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा होणार हे निश्चित झाले आहे. या पदासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू झाले असले तरी आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव सध्या तरी सर्वात आघाडीवर आहे.


सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांना 

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद देण्याची मागणी पक्षाध्यक्षांकडे केली आहे. शिंदे कुटुंबीय हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त असून कोणतेही काम करण्यापूर्वी ते आधी विठ्ठलाचे दर्शन घेतात. सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूरसाठी खूप मोठा निधी दिला होता, असे नमूद करत सोलापूर काँग्रेसने प्रणिती शिंदे यांच्यासाठी आग्रह धरला आहे.


काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात शिर्डी देवस्थान काँग्रेसकडे तर पंढरपूर देवस्थान राष्ट्रवादीकडे असायचे. यावेळी पहिल्यांदाच विठ्ठल मंदिर समिती काँग्रेसकडे आल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत. विठ्ठल मंदिर समितीची वार्षिक उलाढाल ३५ कोटींच्या आसपास असली तरी विठुरायाच्या दर्शनाला वर्षभरात दीड कोटी भाविक येत असल्याने हे देवस्थान ताब्यात येणे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत आहे. राज्यातील बहुजन समाजाचा देव अशी मान्यता असलेल्या विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून काम करणे फायदेशीर असल्याने काँग्रेसने अध्यक्षपदासाठी उमेदवार शोध सुरू केला आहे. यातच सदस्य पदासाठी देखील अनेक वारकरी महाराजांना काँग्रेस प्रेम वाटू लागले आहे.

दरम्यानमहाविकास आघाडी समन्वय समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत महामंडळं व देवस्थान समितीबाबत चर्चा झाली. त्यात वाटपाचे सूत्र निश्चित झाले असून तिन्ही पक्षांचे त्यावर एकमत बनल्याचे नंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दुजोरा दिला होता. यात शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय झाला तर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहील, असेही ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या