अण्णा म्हणतात, प्रत्येक प्रश्नावर मीच आंदोलन
करावं का?
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
हजारे यांच्या वाढदिवशी त्यांना अनेकांनी शुभेच्छा
दिल्या. मंत्री आव्हाड यांनीही शुभेच्छा दिल्या होत्या, पण त्या खोचक शब्दांत दिल्याने त्याची
वेगळी चर्चा झाली. आव्हाड यांनी म्हटले होते, प्रिय अण्णा,
प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल
यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती
सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही
तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता.’
आव्हाड यांनी केलेलं ट्वीट सोशल मीडियात चर्चेचा
विषय ठरले होते. काही नेटकऱ्यांनी आव्हाड यांचे समर्थन केले तर काहींना हजारे
यांच्यावतीने उत्तर देण्याचाही प्रयत्न केला होता. स्वत: हजारे यांनीही आव्हाड
यांना अशाच खोचक शब्दांत उत्तर दिले आहे.
हजारे यांनी म्हटले आहे की, मी एक सामान्य माणूस आहे. जनतेची सेवा
करतो. पण तुम्ही तर मंत्री आहात, या प्रश्नांसाठी मग तुम्ही
काय केले? प्रत्येक प्रश्नासाठी हजारे यांनीच आंदोलन करावे
का? तुम्हीही जनतेचे सेवक आहात, मग
तुम्ही जनतेसाठी काम करीत नाही का?’ असा सवाल उपस्थित करून
हजारे यांनी आव्हाड यांना उत्तर दिले आहे.
सुरवातीला हजारे यांनी उत्तर देण्याचे टाळले होते.
नंतर त्यांनी केवळ हे प्रश्न उपस्थित करून उत्तर दिले आहे. हजारे यांच्या
भूमिकेसंबंधी काही घटकांकडून सातत्याने शंका घेण्यात येत असते. राष्ट्रवादीचे नेते
यामध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे संधी मिळताच हजारे यांच्यावर टीका केली जात
असल्याचे दिसून येते. वाढदिवसाचे निमित्त साधून आव्हाड यांनी शुभेच्छा देतानाही
टीका करण्याची संधी साधली होती. अशा टीकेची दखल घ्यायची नाही, उत्तर द्यायचे नाही, असे हजारे यांनी ठरविल्याचे दिसून येते. अनेकदा हजारे अशा प्रकारांकडे
दुर्लक्षच करताना दिसतात.
0 टिप्पण्या