मर्दासारखे लढत राहायचे की शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार मावळ्यानी करावा
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळं राजकीय वर्तुळात
खळबळ उडाली आहे. या पत्रावर शिवसेना काय प्रतिक्रिया देते
याकडे सर्वांचे लक्ष असतानाच आज सामनाच्या अग्रलेखातून सरनाईकांच्या पत्रावर
शिवसेनेनं भाष्य केलं आहे. ' महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना विनाकारण त्रास देण्याचे
उपद्याप सुरुच आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र
असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकानं
करायला हवा,' असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
' केंद्रीय तपास यंत्रणांचा
विनाकारण त्रास होत आहे. त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून
घ्या, अशा आशयाचे एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी
मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय
मांडले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र
लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या
पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे.
ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत,' असा
टोला शिवसेनेनं लगावला आहे.
' सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम
इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून
महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या
कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ
दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक
यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रातील 'विनाकारण त्रास' हाच शब्द व त्यामागच्या भावना
महत्त्वाच्या आहेत,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
' शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा
नाहीतर परिणामांस सामोरे जा, अशा दाबदबावाला बळी न जाता
शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले. म्हणून आजची
शिवसेना तेजाने तळपताना दिसत आहे. ही शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन
करून ठेवली. म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदे भोगता आली. कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा
शिवसैनिक हेच शिवसेनेचे 'बळ' आहे,'
असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
0 टिप्पण्या