Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण ; काय आहे उपचारपद्धती ?







 लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई :राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण आढळले असले, तरीही त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये. हे करोना विषाणूचे बदललेले स्वरूप आहे. करोनासाठी जी वैद्यकीय उपचार पद्धती दिली जाते, तीच उपचार पद्धती या विषाणूवरही मदतगार ठरू शकेल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.


सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. माधव साठे यांनी सांगितले की, डेल्टा हा करोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूमध्ये असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता अधिक वाढली आहे. त्यामुळे पूर्वी जी लक्षणे सहा ते सात दिवसांनी दिसायची, ती आता संसर्ग झाल्यानंतर लवकर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांकडे गेल्यास लक्षणांची तीव्रता वाढणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


जनुकीय तपासणी का गरजेची?

आरटीपीसीआर तपासणी करून रोगनिदान करणे शक्य आहे का, तसेच सध्याचा औषधोपचार बदलणे गरजेचे आहे का, यासाठी ही तपासणी केली जाते. लसीकरणामुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती पुरेशी आहे का, रोगाच्या लक्षणांमध्ये तसेच रोगप्रसाराच्या पद्धतीमध्ये काही बदल आहे का, विषाणू किती घातक झाला आहे, नवीन लस तयार करण्याची गरज भासणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे ही जनुकीय अभ्यासातून मिळू शकतात. त्यामुळे या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सात हजार ५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांची जनुकीय तपासणी करण्यात येणार आहे.


डेल्टा विषाणू हा अधिक संसर्गकारक आहे. त्यामुळे कटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये चटकन पसरतो. तो आधीच्या स्ट्रेनपेक्षा शरीरात लवकर पसरतो. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसांत दिसू लागतात. या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास औषधोपचार हे करोनाच्या उपचारपद्धतीसारखेच आहेत. मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दीत न जाणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे.

लसीकरण लाभदायक

लसीकरणाचा वेग वाढवल्यास लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात समूह प्रतिकारशक्ती निर्माण होईल. त्यामुळे करोना संसर्गाचा वेग मंदावेल. या स्ट्रेनमध्येही लसीकरण हे मदतगार शस्त्र असल्याचा विश्वास संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. व्ही. व्ही. नायर यांनी व्यक्त केला. लसीकरणासंबंधी दोन मात्रांमधील अंतराचे सर्व निकष योग्यप्रकारे पाळायला हवेत, तसेच लशींची उपलब्धताही तत्परतेने हवी असे त्यांनी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या