औरंगाबाद
/बुलडाणा:शेतातील धुऱ्याच्या वादावरून सोळंके परिवारावर खरात कुटुंबियाने
सशस्त्र हल्ला केल्याने यामध्ये तीन जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सिंदखेड
राजा तालुक्यातील डावरगाव येथे घडली आहे. या प्रकरणी सिंदखेड राजा पोलिसात गुन्हे
दाखल करण्यात आले असून जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू
आहेत.यातील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मंदा सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डावरगाव येथील खरात व सोळंके परिवारात
गेल्या १० वर्षांपासूनशेतीचा वाद आहे. २३ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धुरा व पेरणीच्या कारणावरून
दोन कुटुंबात वाद झाला. या वादातून खरात कुटुंबियांनी लाठ्याकाठ्या आणि कुऱ्हाडीने
केलेल्या हल्ल्यात सोळंके परिवारातील तिघे बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. या तक्रारीत म्हटल्यानुसार, पती प्रकाश सोळंके, सासरे बाळासाहेब सोळंके, सासू बेबी सोळंके, दीर गजानन सोळंके, जाऊ स्वाती सोळंके, मुलगा प्रशांत, मुलगी वैष्णवी, पुतणी दुर्गा, पुतण्या देवांश हे पेरणीसाठी शेतात
गेले असता बाजूच्या शेतात असलेल्या खरात कुटुंबीयांनी सोळंकी कुटुंबावर कुऱ्हाडीने
व लाठ्या- काठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. यात बेसावध असलेले सोळंके परिवारातील
तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात
उपचार सुरू आहे.
खरात परिवारातील ७ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे. खरात परिवाराविरोधात सिंदखेडराजा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक
केली नसल्याने जखमी प्रकाश सोळंके यानी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना
निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0 टिप्पण्या