लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: अहमदनगर महापालिकेच्या
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले असले तरी
जिल्ह्यात मात्र पालकमंत्रिपदावरून दोघांत मतभेदाची चिन्हे दिसू लागली आहेत.
कृषिमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे
संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नेवासा तालुक्यात झालेल्या शिवसंवाद
मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याबद्दल जाहीर
नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांच्याऐवजी शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांना नगरचे पालकमंत्री करावे, अशी
मागणी करण्यात आली. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनही भुसे आणि
कोरगावकर यांनी दिले.
पालकमंत्री मुश्रीफ
यांच्याविषयी अन्य पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकांमधूनही यापूर्वी नाराजी
व्यक्त झाली होती. आता शिवसेनेने यामध्ये जाहीरपणे उडी घेतली आहे. मुश्रीफ हे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. तर त्यांच्याऐवजी
ज्यांचे नाव पुढे केले जात आहे, ते गडाख मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे यांच्या मर्जीतील मानले जातात. त्यामुळे या वादाला वेगळे महत्त्व प्राप्त
होत आहे. नगर जिल्ह्यात १२ पैकी राष्ट्रवादीचे ६, भाजपचे ३,
काँग्रेसचे २, शिवसेनेचा १ आमदार असे संख्याबळ
आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यावेळी राष्ट्रवादीकडे देण्यात आले होते.
या पदावर कोल्हापूरचे मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्यापासूनच विरोध सुरू झाला होता.
एवढ्या दूरचा पालकमंत्री नको, अशी भूमिका होती. त्यावेळी
काँग्रेसचे मंत्री व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाराजीनाट्यही
पाहायला मिळाले. सुरुवातीला मुश्रीफ स्वत:ही तयार नव्हते. मात्र, त्यांनी जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली. कोल्हापूरमध्ये जास्त
काळ कार्यरत असल्याने त्यांना नगरकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, यावरूनही जिल्ह्यातून तक्रारीचा सूर आहे. तर गडाख सध्या उस्मानाबादचे
पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यात त्यांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही.
शिवसेनेने याला जाहीर तोंड फोडले आहे.
कृषिमंत्री दादा भुसे, जलसंधारणमंत्री
शंकरराव गडाख व शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नेवासा
तालुक्यात सोनई येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ‘शिवसंवाद’
मेळावा झाला. त्यामध्ये मंत्री गडाख यांना नगर जिल्ह्याचे
पालकमंत्री करा, अशी मागणी पुढे करण्यात आली. या मागणीची दखल
घेत कोरगावकर व भुसे यांनी आपल्या भाषणातून सूचक वक्तव्य केली. कार्यकर्त्यांच्या
मागणीलाच पाठिंबा दर्शविणारी ही वक्तव्य असल्याने त्यांचे घोषणा देत स्वागत
करण्यात आले. मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या
कार्यपद्धतीवर नाराजी केली.
यावर बोलताना मंत्री भुसे म्हणाले, ‘काही गोष्टी अशा असतात की त्या येथे
बोलता येणार नाहीत. त्यासाठी आम्हाला मंत्रालय पातळीवर बोलावे लागणार आहे. यातील
काही गोष्टी तर मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालाव्या लागणार आहेत. सध्याच्या
पालकमंत्र्यांनीही लक्षात घ्यावे की महाविकास आघाडीचे सरकार असल्याने सर्वांना
सोबत घेऊन काम केले पाहिजे. या सरकारमध्ये शिवसेना मोठा भाऊ म्हणून काम करत आहे.
त्याच पद्धतीची वागणूक नगर जिल्ह्याच्या शिवसेनेलासुद्धा मिळाली पाहिजे. आपण हा
मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्याही कानावर घालू.
तुमच्या मनात जे काही आहे, तेही होतय का, हेही
आपण पाहू,’ असे म्हणत भुसे यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीला
बळ दिले. तर कोरगावकर यांनी पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्रिपदाबाबत केलेली मागणी आपण
निश्चितच पक्षप्रमुखांपर्यंत नेऊ, असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना गडाख यांनी भाजपकडून झालेल्या त्रासाचा पक्षाचे
नाव न घेता पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत मला एका
पक्षाने प्रचंड त्रास दिला. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला आधार दिला,
धीर दिला, मला मदत केली. अनेक नेत्यांच्या
बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. अनेक जणांचा अनुभव घेऊन मी आता
शिवसेनेत आलो आहे. उद्धव ठाकरेंसारखे नेतृत्व मी कुठल्याही पक्षात पाहिलेले नाही.
त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत अनेक अडचणी असताना मला मंत्रिपदावर बसवलं.
त्यांच्यासह शिवसैनिकांच्या अपेक्षा मी निश्चितच कामातून पूर्ण करणार आहे.’
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी आणि
पदाधिकाऱ्यांनी केलेली सूचक वक्तव्य यामुळे नगरला आता पालकमंत्रिपदासाठी
राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात वादंग रंगणार आहे.
0 टिप्पण्या