Ticker

6/Breaking/ticker-posts

टायगर आता काँग्रेसमय झालाय !; नाना पटोले यांचाही शिवसेनेला टोला

 *राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना काँग्रेस पक्षात विलीन.

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई: राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना काल काँग्रेस पक्षात विलीन झाली. या संघटनेचं पक्षात स्वागत करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. टायगर म्हणजेच वाघ आता काँग्रेसमय झाला आहे, असे पटोले म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हंशा पिकला. ' आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो', असं विधान काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथे ओबीसी चिंतन बैठकीत केलं होतं. त्यानंतर आज पटोले यांनीही तशीच टोलेबाजी केल्याने शिवसेनेतून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.


नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते. 

यावेळी पटोले यांनी टायगर हा शब्द पकडत टोलेबाजी केली. ' राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस पक्षात विलीन झाली आहे. टायगर अर्थात वाघाला इलाका नसतो आणि पंजा फक्त टायगरकडे असतो आणि आता टायगर काँग्रेसमय झाला आहे', असे यावेळी पटोले म्हणाले. बंजारा टायगर फोर्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून नाना पटोले म्हणाले की, स्वर्गीय वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी राज्यात ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करून राज्याला प्रकाशात आणले. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती झाली. बंजारा समाजाने राज्याला दिशा दाखवून दिली. बंजारा समाज हा आत्मसन्मासाठी लढणारा, देशहितासाठी काम करणारा समाज आहे.

यावेळी बोलताना आमदार राजेश राठोड व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी, बंजारा टायगर फोर्सच्या काँग्रेस पक्षातील विलिनीकरणामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. भाजपचा खरा चेहरा आता बंजारा समाजासमोर आला असून बंजारा समाज भाजपला थारा देणार नाही, असे सांगितले. सध्याच्या परिस्थितीत फक्त काँग्रेस पक्षच बंजारा समाजाला न्याय देऊ शकतो त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून यापुढे काँग्रेस विचारांवर वाटचाल करू व राज्यभरात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करू असे आत्माराम जाधव व मदन जाधव यांनी सांगितले.

मोदींनी 'ते' आश्वासनही पाळले नाही

भारतीय जनता पक्षाने धनगर, मराठा समाजाची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक बंजारा समाजाचीही केली आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो असे लेखी आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत त्यांनी तो शब्द पाळला नाही. बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या दैवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या