Ticker

6/Breaking/ticker-posts

'स्वबळा'च्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये रंगली सुदोपसुंदी ?

 


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवसेनेच्या स्थापनादिनी केलेल्या भाषणात टीका केली असतानाच काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनीही या नाऱ्याबाबत अप्रत्यक्षरीत्या नाराजी दर्शवली. 


सध्या सरकार मजबुतीने चालवणे हे काँग्रेस पक्षाचे काम असून काँग्रेस आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले. मात्र, त्याच वेळी सुशीलकुमार शिंदेपृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप यांच्यासारख्या नेत्यांनी स्वबळाच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांचे कौतुक केले आहे.


महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसला मजबूत करणे आणि २०२४ मध्ये राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील यासाठी संकल्प करण्याचे आवाहन मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या वाढदिवशी शुक्रवारी केले. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम आदी उपस्थित होते.

 

देशातील तरुणवर्ग राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहू इच्छितो. राहुल हे मोदी राजवटीविरोधात संघर्ष करीत असून त्यांच्या संघर्षाला बळ देऊन महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा संकल्प नाना पटोले यांनी बोलून दाखवला. तर, पटोले यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन अवघ्या चार महिन्यांत वादळ निर्माण केल्याचा अभिमान वाटतो असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा त्याग करून ते पक्षासाठी ही पालखी घेऊन पुढे निघाले आहेत. खुर्ची सोडून पक्षासाठी वाहून घेणे ही साधी गोष्ट नाही. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा त्यांचा नारा हा संघटनेत नवी उमेद, ताकद उभी करण्याचे काम करणारा आहे. पटोले हे खऱ्या अर्थाने बारा बलुतेदारांचे कैवारी असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा जोमाने उभी राहील, अशा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केला.



आमची तिकीटे कापली...

माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे आमची तिकिटे कापली जायची, अशी नाराजी देशमुख यांनी या वेळी व्यक्त केली. १९९९पर्यंत महाराष्ट्रातील नेत्यांचे वर्चस्व होते. मी कोणाचे नाव घेणार नाही. परंतु ते आम्हाला तिकीट मिळू द्यायचे नाहीत. १९९९मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळा झाला आणि एका झटक्यात मी, अनिस अहमद, नाना पटोले, नितीन राऊत निवडून आलो, असा दावा देशमुख यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या