Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध ; काय बंद, काय राहणार सुरु?

 डेल्टा प्लसमुळे महाराष्ट्रावर पुन्हा घोंघाऊ  लागले लॉकडाउनचे संकट ?


 







लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळुहळू होत असलेली करोना रुग्णसंख्येतील वाढ तसेच, डेल्टा आणि डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी नवी नियमावली लागू केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आणि महापालिकांना याशिवाय वेळोवेळी राज्य सरकारने दिलेले आदेश आणि करोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे.

वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसचे रुग्ण यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमावाली लागू करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर लक्षात घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील, तर त्यांना मागील दोन आठवड्यांतील करोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल. जर करोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसत असेल, तर वरील टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागतील.

जिल्ह्यात किंवा महापालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी काही उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार

पात्र नागरिकांपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे, यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल. 'टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट' या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. हवेमधून पसरू शकणाऱ्या करोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करावी लागेल. मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे, करोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे, गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रे तयार करताना काळजीपूर्वक आढावा घेणे, जेणेकरून ज्या भागात करोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील. विशेष करून विवाह सोहळे आणि उपाहारगृह, मॉल यासारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करून प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरती पथके नियुक्त करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.


 काय सुरू काय बंद
* अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन यावेळेत खुली राहतील. सर्व मॉल आणि थिएटर बंद राहतील.


* सोमवार ते शुक्रवार हॉटेल ५० टक्के क्षमतेने दुपारी दोनन वाजेपर्यंत खुली राहतील, त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही  सुविधा शनिवार-रविवार बंद राहील.

* लोकल आणि रेल्वे बंद राहतील.

*मॉर्निंग वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत मुभा असेल.

*खासगी आणि सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू असतील.

*स्टुडिओत चित्रीकरण परवानगी, मात्र, ते सोमवार ते शनिवार चित्रीकरण करता येईल.



* मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत खुले असणार. हे  सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील.

* लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने, तर अंत्यविधीला २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल.

*बांधकाम दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा

* शेतीविषयक सर्व कामे करता येतील.

*ई कॉमर्स दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असेल.

* जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

डेल्टा प्लसमुळे मृत्यू


 ‘‘  करोनाच्या 'चिंताजनक' या वर्गवारीतील डेल्टा प्लस स्वरूपाच्या विषाणूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात संगमेश्वर येथील एका ज्येष्ठ महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला. ऐंशी वर्षांपुढे वय असलेल्या या महिलेला काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना काही सहव्याधी होत्या का, याची तपासणी केली जात असल्याचे रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले. देशभरात आतापर्यंत जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलेल्या ४५ हजार नमुन्यांमध्ये डेल्टा प्लसचे ४८ रुग्ण आढळले असून त्यातील सर्वाधिक २० रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. अधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा प्लस स्वरूपाने चिंता वाढवल्या आहेत.’’

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या