लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर: वॉर्डात झालेल्या भांडणाची
फिर्याद देण्यासाठी एकाच वेळी येथील तोफखाना
पोलिस ठाण्यात आलेल्या दोन गटांत
तुफान हाणामारी झाली. कोयता आणि चाकूने एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला. पोलिसांनी
वेळीच हस्तक्षेप करून आवरल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये दोन्ही बाजूचे
कार्यकर्ते जखमी झाले असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस ठाण्याच्या
आवारातील सीसीटीव्ही तपासून घटना नेमकी कशी घडली, याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी
पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागात
महिलांच्या दोन गटांत दुपारी भांडणे झाली. त्यावरून दोन गटांत तेथेच वाद झाला.
याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील
गायकवाड यांनी पोलीस पथकाला त्या
भागात पाठविले. मात्र, तोपर्यंत हे दोन्ही गट फिर्याद देण्यासाठी नगर शहरातील तोफखाना पोलीस
ठाण्यात यायला निघाले होते.
पोलीस ठाण्यात एकाच वेळी दोन्ही गटांचे लोक पोहचले. एकमेकांना समोर पहाताच त्यांच्यात पुन्हा वाद पेटला. पहाता पहाता मारामारी सुरू झाली. चाकू आणि कोयता नाचवत पोलीस ठाण्याच्या आवारात हल्ला करण्यात आला. पोलीस ठाण्याच्या आवारातील एका गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. हा प्रकार पाहून तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शैलेश गोमसाळे व वैशाली भामरे धावतच जमावात शिरले. त्यांनी या दोन्ही गटांना बाजूला काढले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टाळला. यामध्ये गणेश कुर्हाडे याने सचिन निकम व त्याचा मित्र गणेश पाटोळे याच्यावर चाकू हल्ला केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सचिन निकम यांच्या डोक्याला मार लागला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी
गुन्हे दाखल करून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. गणेश कुऱ्हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर
डाके, गौरव जगधने, बाळासाहेब वाघमारे
प्रथमेश चौरे यांच्याविरुद्ध तर दुसऱ्या फिर्यादीवरून सचिन निकम, जयेश पाटोळे व अन्य दोन ते तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील
आरोपी गणेश कुऱ्हाडे याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे पूर्वीच दाखल आहेत. त्यामध्ये
घरफोड्यांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
0 टिप्पण्या