महाराष्ट्रात आणीबाणी सारखीच स्थिती;भाजपचा काँग्रेस - शिवसेनेवर निशाणा.
लोकनेता
न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: आणीबाणी लादण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणारी शिवसेना काँग्रेस
पक्षाच्या सहकार्याने सध्या राज्यातील जनतेला आणीबाणीचा अनुभव देते आहे. राज्य
सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन
करणाऱ्यांचा आवाज दडपला जात आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश
भाजपने केली आहे.
भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रदेश
कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी
ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजप प्रदेश
युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील उपस्थित होते. उपाध्ये यांनी सांगितले
की, अटकेच्या भीतीने आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना आज
काँग्रेसच्या पाठिंब्याने राज्यात सत्तेत आहे. राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास
आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा आहे. राज्य सरकारविरोधात
बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन
करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहेत. आणीबाणीत झालेले
अत्याचार, सरकारी दडपशाही याचा प्रत्यय राज्यातील जनता सध्या
घेत आहे. राज्य सरकारच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, लिहू
शकत नाही अशी आणीबाणी सदृश्य स्थिती आज राज्यात आहे.
२५ जून
१९७५ रोजी काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली. आणीबाणी लादून काँग्रेसने अभिव्यक्ती
स्वातंत्र्याचा गळा घोटला. त्या काळ्या पर्वाची माहिती युवा पिढीला करून
देण्यासाठी भाजपा युवा मोर्चातर्फे आज राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे अनेक नेते यात सहभागी झाले
आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात युवा मोर्चातर्फे आणीबाणीच्या काळ्या पर्वाचे
स्मरण करून देणारे कार्यक्रम होणार आहेत, असेही उपाध्ये
यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या