Ticker

6/Breaking/ticker-posts

गंगापूर धरण परीसरात खुद्द 'बिबट्या'चा पहारा; पर्यटकांची पाचावर धारण !

 







लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

नाशिक/ गंगापूर: काही दिवसांपासून गंगापूर क्षेत्र आणि पर्यटकांसह नागरिकांची गर्दी हा चर्चेचा मुद्दा ठरला असून, प्रशासनाने सायकली जप्त करूनही नागरिक धास्तावले नव्हते. मात्र, आता या वाटेवर बिबट्यानेच बैठक मारल्याने धरण क्षेत्रालगत जाणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

 

गंगापूर रोपवाटिकेजवळील भागात प्रौढ बछड्यासह बिबट्यने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे या भागात फिरणाऱ्यांची संख्या घटली असून, धरणाच्या वाटेसाठी जणू बिबट्याच सुरक्षारक्षक ठरला आहे. नाशिक शहर आणि नजीकचा शेतमळ्यांच्या परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याने बिबट्याचे दर्शन होणे नाशिककरांना नवीन नाही. परंतु, बिबट्याच्या डरकाळीनंतर नागरिकांमध्ये निर्माण होणाऱ्या दहशतीचा प्रत्यय गंगापूर धरण क्षेत्रात येत आहे.

जिल्ह्यातील निर्बंध कमी झाल्यावर धरणाच्या भिंतीवर सायकलिंग, वॉकिंग आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली. पश्चिम वन विभागाच्या गंगापूर रोपवाटिकेच्या शेजारून धरणाच्या भिंतीकडे रस्ता जातो. या रस्त्यावरून सोमवारी सकाळी जात असताना प्रौढ बिबट्याने रोपवाटिकेच्या भिंतीवर बैठक मारल्याचे काही नागरिकांनी पाहिले. शेजारीच असलेल्या दाट झाडांमध्येदेखील एक बिबट्या दिसला. त्यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले. 

वन खात्याला यासंदर्भात माहिती दिली गेली. शेजारीच रोपवाटिका असल्याने वन खात्याने बिबट्याचा अधिवास असल्याच्या वृत्ताला त्वरित दुजोरा दिला. बिबट्याच्या दर्शनाचा व्हिडीओ व्हायरल होताच मंगळवारी सकाळपासून त्याचा परिणाम जाणवला. मंगळवारी व काल सकाळी नागरिकांची घटलेली संख्या सायंकाळीदेखील कमीच राहिली. अनेक जण रोपवाटिकेपर्यंत आल्यावर बिबट्याच्या दर्शनाची माहिती मिळाल्यावर माघारी फिरकल्याचे वन पथकाने सांगितले. 

या परिसरात वन विभागाची कायम गस्त असून, धरण क्षेत्रालगत जाणाऱ्या रस्त्यावर दाट झाडी व मोकळ्या जागेमुळे बिबट्याचा अधिवास असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून, या शक्यतो या भागातून जाणे टाळावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

रहिवासी क्षेत्र कमी असल्याने पिंजरा लावता येणार नाही

गंगापूर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील क्षेत्र प्रतिबंधित आहे. मुळात या भागात पर्यटक, मॉर्निंग वॉक किंवा सायकलिंगला परवानगी नाही. पर्यटक आणि नाशिककर नियम झुगारून या भागात येतात. येथील रोपवाटिकेसह लगतच्या क्षेत्रात नैसर्गिक आडोसा अधिक आहे. यासह दाट झाडीमुळे येथे अनेकदा बिबट्यांच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. त्यामुळे हा परिसर बिबट्याचा अधिवास असून, त्याला कैद करता येणार नाही. या ठिकाणी रहिवासी क्षेत्र कमी असल्याने पिंजरा लावता येणार नाही, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या