Ticker

6/Breaking/ticker-posts

भर रस्त्यात पोलिसदादांची फ्रि स्टाईल ; एकाला केलं निलंबित

 







लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 पुणे : शहरातील पौड फाटा परिसरात दोन पोलिसांत मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या फ्री स्टाईलची चांगलीच चर्चा रंगली होती. तसंच विनाकारण भांडण करत सहकारी पोलिसाला मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे, झोन तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे.


रस्त्यावरच विनाकारण भांडण करत दुसऱ्या पोलिसाला मारहाण करून पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत त्यांनी ही कारवाई केली आहे. विजयकुमार पाटणे असं निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पाटणे हे कोथरूड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. १० मे रोजी पौड फाटा परिसरात रात्री दहाच्या सुमारास कारवाई करत होते. पाटणे यांची नेमणूक कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी नेमणूक असताना ते पौड फाटा परिसरात गेले. त्यावेळी पोलिस शिपाई श्रावण शेवाळे हे फोनवर कोणाशी तरी बोलत होते. त्यावेळी पाटणे पाठीमागून त्यांच्याजवळ गेले. धक्का का दिला म्हणून त्यांनी शेवाळे यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण सुरू केली.



पोलिस कर्मचारी रमेश चौधरी हे भांडण सोडविण्यासाठी गेले, मात्र झटापटीत त्यांच्या हाताला मार लागला. शेवाळे यांनी कोणत्याही प्रकारचा धक्का दिला नसताना पाटणे यांनी वाद घालून त्यांना मारहाण केली. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात स्टेशन डायरीला नोंद करण्यात आली होती. तसेच, वरिष्ठ निरीक्षकांनी या घटनेचा सविस्तर चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केला होता.

 

पाटणे यांनी त्यांना नेमूण दिलेलं बंदोबस्त ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी गेल्याचं स्पष्ट झालं. त्यासाठी वरिष्ठांची परवानगी देखील घेतली नाही. त्यानंतर सहकारी पोलिसासोबत भररस्त्यामध्ये वादावादी करून मारहाण केली. तसेच, अन्य कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली. या सर्व गोष्टीमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेजाबदारपणाचे वर्तन केल्याचा ठपका ठेऊन पाटणे यांना उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी निलंबित केलं आहे. विजयकुमार पाटणे यांची आता विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या