लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: नागरिकांमध्ये करोंना विषाणूविरु्ध लढण्यासाठी अॅण्टीबॉडीज तयार झाल्यात किंवा नाहीत, याचा अभ्यास करण्यासाठी आजपासून (२५ जून) नगर जिल्ह्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या वतीने सिरो सर्वे केला जाणार आहे. यामध्ये यावेळी मुलांचाही प्रथमच समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सिरो सर्वेलन्स अधिकारी डॉ. चेतन खाडे यांनी दिली.
यापूर्वी जिल्ह्यात तीन वेळा सिरोसर्वे करण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये लहान मुलांचा समावेश नव्हता. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहेत. याशिवाय दुसऱ्या लाटेत मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याचे नगर जिल्ह्यातून पुढे आले होते. त्यामुळे यावेळी या सर्वेमध्ये मुलांचाही समावेश करण्यात आला आहे. सहा ते १७ वर्षे वयोगट आणि अठरा ते त्यापुढील वयाच्या व्यक्ती यांची तपासणी करून त्यांच्यामध्ये अॅण्डीबॉडीज विकसित झाल्यात किंवा कसे याचा अभ्यास केला जाणार आहे. जिल्ह्यातील विविध गावातील आणि विविध वयोगटातील ४०० जणांची चाचणी यासाठी केली जाणार आहे.
यंत्रणांना दक्षेतेचे आदेश
करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून करोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी नियम मोडणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे.
सध्या रुग्णसंख्या काहीशी घटल्याचे चित्र असले तरी अद्याप काही तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन गांभीर्यांने करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे. तालुकास्तरीय यंत्रणांनीही या नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करावी. मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम, लग्न समारंभ, सोहळे शक्यतो टाळावेत अथवा कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करून परवानगी दिलेल्या मर्यादेतच करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या