Ticker

6/Breaking/ticker-posts

अडीच लाखांची लाच घेताना अप्पर तहसीलदार, तलाठ्यास रंगेहात पकडले

 





लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 सांगली : मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाई टाळण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच घेणारा अप्पर तहसिलदार आणि तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. अप्पर तहसीलदार हनुमंत म्हेत्रे आणि तलाठी विशाल विष्णू उदगिरे अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. २२) दुपारी संख (ता. जत) येथे सापळा रचून ही कारवाई केली.


पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संख येथे मातीची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर अपर तहसीलदार आणि तलाठ्यांकडून कारवाई करण्याचे काम सुरू होते. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी काही वाहने जप्त केली होती. वाहने परत घेऊन जाण्यासाठी अधिकार्‍यांकडून लाचेची मागणी सुरू होती. याबाबत तक्रारदाराने पाच जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अपर तहसीलदार हणुमंत म्हेत्रे आणि तलाठी विशाल उदगिरे यांनी तक्रारदारांकडे अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.


लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात सबळ पुरावे मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी संख येथील तलाठी कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी तक्रार दाराकडून अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना अप्पर तहसीलदार हनुमंत मेहेत्रे आणि तलाठी विशाल उदगिरे या दोघांना रंगेहात अटक करण्यात आले. दोन्ही लाचखोरांविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले आदींनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे जत तालुक्यातील अवैध माती, मुरूम आणि वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या