Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना आजाराचे बदलते स्वरूप ; वैद्यकीय तज्ज्ञांपुढेही मोठे आव्हान..

 








लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

मुंबई :- करोना संसर्ग होऊन गेल्याची कोणतीही पूर्वकल्पना नसलेल्या मात्र मधुमेह असलेल्या ४० वर्षीय महिलेवर म्युकरमायकोसिससाठी कूपर रुग्णालायमध्ये वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. या महिलेने वैद्यकीय तपासणीमध्ये करोना संसर्ग झाला नसल्याचे सांगितले होते. पण जेव्हा अॅण्टीबॉडी चाचणी केली तेव्हा तिला करोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे दिसून आले. करोनासाठी कोणतेही वैद्यकीय उपचार, स्टिरॉइड तिने घेतलेले नव्हते, तरीही त्यांना म्युकरमायकोसिस झाला. अशा प्रकारच्या दुसऱ्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांनाही अशा प्रकारच्या म्युकरची वाढ नेमकी कशामुळे होते, असा प्रश्न पडला आहे.


हा वैद्यकीय तिढा सोडवण्यासाठी या प्रकारचा बुरशीसंसर्ग नेमका कोणत्या कारणांमुळे होतो याच्या अभ्यासाची निकड आता नेत्ररोगतज्ज्ञ, इएनटी तज्ज्ञांना जाणवू लागली आहे. हे प्रमाण अतिशय कमी असले तरीही लक्षणे नसलेल्या करोनाच्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस का होतो, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यासंदर्भात टास्क फोर्स समितीचे डॉ. आशीष भूमकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या रुग्णांचे प्रमाण कमी आहे, मात्र हा विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे म्युकर होतो का, याचाही अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 


पूर्वी रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये हा संधीसाधू म्युकर पटकन संसर्ग फैलावण्यासाठी कारण ठरायचा. आत या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती काही काळासाठी कमी झाल्यानंतर ती पुन्हा वाढते, त्यामुळे म्युकरची लागण झाल्याचे लगेच निष्पन्न होत नाही. औषधांची उपलब्धता काही दिवसांसाठी नसतानाही हे रुग्ण स्थिर राहतात, हा यातील बदल लक्षात घ्यायला हवा.


कूपर रुग्णालयाच्या नेत्रविभागाच्या प्रमुख डॉ. चारुता मांडके यांनी यासंदर्भात सांगितले की अशा प्रकारच्या किती रुग्णांची रुग्णालयांमध्ये नोंद झाली आहे याचा विस्तृत अभ्यास व संशोधन करण्याची गरज आहे. मुंबईत राहणाऱ्या वरील महिलेला करोना असल्याचे अॅण्टीबॉडी चाचण्या केल्यानंतर स्पष्ट झाले. तिला मधुमेह आहे, सध्या इंजेक्शन सुरू आहे. तिची दृष्टी गेली आहे, मात्र डोळा (अवयव) काढावा लागू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे डॉ. मांडके यांनी स्पष्ट केले.



यूकेमध्ये नवा स्ट्रेन

यूकेमध्ये करोना संसर्गाचा फैलाव करणाऱ्या विषाणूचा नवा स्ट्रेन आता आढळून आला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत तिथे करोना संसर्गाची स्थिती काय आहे, म्युकरमायकोसिसचे प्रमाण किती व कशाप्रकारे वाढते याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचे व अभ्यासकांचे लक्ष लागून राहिले आहे. लसीकरण हे करोना संसर्गाला रोखण्यासाठी उत्तम शस्त्र असले तरीही ते अत्यंत वेगवान पद्धतीने व्हायला हवे. 


लशींची उपलब्धता पुरेशी नसणे, लसीकरण योग्यवेळी न झाल्याने संसर्ग फैलावणाऱ्या विषाणूला त्याचे स्वरुप बदलण्यासाठी अवधी मिळतो. हे टाळायचे असेल तर लसीकरणाची मोहिम अधिक आक्रमकरित्या राबवा, असा आग्रह सरकारकडे संबधित क्षेत्रातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या