Ticker

6/Breaking/ticker-posts

नाशिकमध्ये पर्यटकांची 'चोरीचोरी-चुपकेचुपके ..धूम ! '

 


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नाशिक : गत आठवड्यातील गर्दीनंतर पोलिसांसह वन यंत्रणेने रविवारी सकाळपासूनच चोख बंदोबस्त तैनात करीत हौशी पर्यटकांची 'नाकाबंदी' करण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, अतिउत्साही पर्यटकांनी 'चोरी-चोरी.. चुपके-चुपके'चा खेळ करीत पर्यटनस्थळांवर स्वारी केल्याचे चित्र दिसून आले.

 धरण क्षेत्रांसह गड-किल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पर्यटकांना रोखण्यात आले. पण, ऐकतील ते अतिउत्साही कसले? नियम झुगारून पोलिसांची नजर चुकवून अनेकांनी पर्यटनस्थळांवर घुसखोरी केली. पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी काही ठिकाणी मोकळीक दिली गेली, त्यामुळे पर्यटकांचे फावले होते. हीच हौस करोना संसर्गात भर घालण्याचे कारण ठरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.


धोकादायक पर्यटनाला चाप लावण्यासाठी ग्रामीण पोलिसांसह वन खात्याने पर्यटनबंदी घोषित केली. त्यानुसार या 'वीकेंड'ला पोलिसांसह वन पथकांनी चोख बॅरिकेडिंग केले. त्यामुळे पहिने बारीच्या रस्त्यांलगत पर्यटकांचे जथे नजरेस पडले नाहीत. शहरालगतच्या डोंगरांसह गडांवरदेखील ट्रेकर्स, पर्यटकांची संख्या मर्यादित राहिली. शहरालगतच्या गंगापूर बॅक वॉटर, कश्यपी, वैतारणालगतचा परिसर या भागात पर्यटक फिरकले नाहीत. पोलिसांनी वेळीच रोखल्याने कुटुंबीयासह तरुणाईला माघारी जावे लागले. मात्र, पोलिसांची नजर चुकवून, बॅरिकेडिंग बाजूला करीत चोरमार्गाने धरणक्षेत्रासह धबधब्यापर्यंत पोहोचण्याची संधी अतिउत्साहींनी सोडली नाही. त्यामुळे एकीकडे नियमपालन होत असताना पर्यटकांचा खोडसाळपणा पुन्हा जाणवला.


रिसॉर्ट्सवर 'धूम'

निसर्गरम्य ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा फौजफाटा असल्याने, अनेकांनी रिसॉर्ट्सकडे मोर्चा वळविला. मित्र-मैत्रिणींसह कुटुंबीयांसोबत रिसॉर्टमध्ये 'वीकेंड' साजरा करण्यात आला. काही रिसॉर्टमध्ये लग्नसराईसह इतर कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. त्या ठिकाणी जाणाऱ्यांनाही पोलिसांचा ओरडा बसला. पोलिसांच्या चौकशीमुळे काही नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिस-नागरिकांत खटके उडाले.

गड-किल्ले बंदच, नियमावली धाब्यावर

सकाळी ७.१६ : अंजनेरी, हरिहर, चामरलेणीसह गड-किल्ल्यांवर जाणारे रस्ते वन खात्यातर्फे अडविण्यात आले. वन हद्दीत पर्यट्क नसल्याने नागरिक फारसे फिरकले नाहीत. पण, ट्रेकिंगसाठी तरुणाई नेहमीप्रमाणे गड-किल्ल्यांकडे फिरकली. वन पथकांनी नाक्यावरून पुढे जाऊ न दिल्याने इतरत्र भटकंती करून दुपारनंतर तरुणांनी घर गाठले.

सकाळी ११.३० : सोमेश्वर धबधबा येथे पर्यटक येण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बॅरिकेडिंग केले. पण, ते सरकवून पर्यटक धबधब्यापर्यंत पोहोचले. पाण्यात जलपर्णी असूनही चिमुकल्यांना पात्रात नेत पर्यटनाची हौस भागविण्यात आली. धोकादायक ठिकाणी उभे राहून 'सेल्फी' घेण्यातही नागरिक रमले. दुपारी चारनंतर या गर्दीत आणखी भर पडली. यावेळी सुरक्षित अंतर, मास्कचे नियम धाब्यावर बसवितानाच नागरिकांनी प्रदूषणातही भर घातली.

दुपारी १२.०८ : सावरगावकडून गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा तैनात दिसला. धरणक्षेत्रासह वायनरींमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली गेली. सायंकाळी उशिरापर्यंत हे चौकशीसत्र सुरू राहिले. धरण क्षेत्रांकडे जाणाऱ्यांना 'गप्प घरात बसा, करोनाकाळात कसलं पर्यटन?', असा सज्जड दम भरून पोलिसांनी माघारी पाठविले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या