लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
कल्याण: करोना लॉकडाउनकाळात इतर सर्व आस्थापना बंद करताना
मंदिरांनादेखील टाळे लावले गेले होते. मागील १५ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे
पहिली लाट ओसरल्यावर केवळ तीन महिने काही अटी-शर्तींवर उघडण्यात आली होती, मात्र आता पुन्हा मंदिरे बंदच आहेत.
रुग्णसंख्या कमी झाल्याने सोमवारपासून नियमांचे पालन करत शहरातील व्यवहार सुरू
ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मंदिरे मात्र उघडण्यात आलेली नाहीत.
त्यामुळे मंदिरे उघडण्यासदेखील परवानगी दिली जावी, अशी मागणी
टिट्वाळा मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात
आली आहे.
वर्षभरापासून मंदिरे बंद
असल्याने मंदिरात पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार देणे जिकिरीचे झाले
असून मंदिराकडून गरजूंना आर्थिक सहाय्य करण्याचा उपक्रमदेखील बंद पडला आहे. एकीकडे
दारूच्या दुकानांसह हॉटेल, मॉल उघडण्यास परवानगी देताना
मंदिरेच केवळ कुलूपबंद का, असा त्यांचा सवाल आहे. मंदिर
समितीकडून करोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याने मंदिरे उघडण्यास
सरकारने परवानगी द्यावी, असे पत्र त्यांनी सरकारला धाडले
आहे.
तर,
मंदिरे उघडण्यास परवानगी देताना दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या
करोनासुरक्षेचा प्रश्न आहे. मंदिर उघडले गेल्यास गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी
मंदिर प्रशासनाने सुरक्षा कर्मचारी किंवा खासगी बाउन्सर नेमून सुरक्षित वावराच्या
नियमाचे पालन होते आहे ना, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे
सामाजिक कार्यकर्ता विजय देशेकर यांनी मंदिर प्रशासनाला सुचविले आहे.
0 टिप्पण्या