Ticker

6/Breaking/ticker-posts

सीईटी १०० गुणांची ! अकरावी प्रवेश परीक्षा जुलैअखेर

 

*चार विषयांची निवड करण्याचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य

*मराठीचा समावेश नसल्याने नाराजी







लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई : राज्यात अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा १०० गुणांची असणार आहे. ही परीक्षा जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे, असे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. या परीक्षेसाठी चार विषयांची निवड करण्यात आली आहे. मात्र यामध्ये मराठीचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर, अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. तसेच ही परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे.

प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य परीक्षा परिषदेतर्फे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर या परीक्षेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अंतर्गत एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.



परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असल्याने दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पोर्टलवर परीक्षेला बसायचे की नाही, यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. दहावीचा निकाल साधारण १५ जुलैच्या सुमारास जाहीर होणार असून त्यानंतर जुलैच्या अखेरच्या आठवड्यात किंवा ऑगस्टमध्ये ही परीक्षा होईल, असेही सांगण्यात आले आहे.


इंग्रजीच्या स्तराबाबत स्पष्टता नाही

या परीक्षेत ज्या चार विषयांची निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये मराठीचा समावेश नाही. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, अशा विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची परीक्षा कोणत्या स्तरावर घेणार, याबाबतही यामध्ये खुलासा करण्यात आलेला नाही. यामुळे याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

परीक्षा शुल्क नाही


राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी कोणतेही वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. मात्र सीबीएसई, आयसीएसई तसेच अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या