Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्य सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रतीक्षेनंतरही परदेशींची परवडच..

 *प्रवीण परदेशी मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव



लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई: सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती 'कमी महत्त्वाच्या' मानल्या जाणाऱ्या मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. परदेशी हे येत्या नोव्हेंबरमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. परदेशी हे गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.


राज्य सरकारने बुधवारी सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक   रणजीत कुमार यांची बदली मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी   व्ही. पी. फड यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी तर भिवंडी- निजामपूर महापालिका आयुक्त   डॉ. पंकज आशिया यांची जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी आणि अहेरीचे (जि. गडचिरोली) प्रकल्प अधिकारीराहुल गुप्ता  यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एटापल्लीचे प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी मनूज जिंदाल यांची जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर धारणीच्या प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 परदेशी यांचा असा आहे प्रवास


प्रवीण परदेशी हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिका आयुक्तपदावरून त्यांची अतिरिक्त मुख्य सचिवपदी (नगरविकास व जलसंपदा) नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर परदेशी हे प्रतिनियुक्तीवर संयुक्त राष्ट्रसंघात गेले होते. राज्याने याबाबत प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्र सरकारने परदेशी यांच्या परदेशातील सेवेस मान्यता दिली होती. ११ महिन्यांसाठी ही प्रतिनियुक्ती होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण आणि संशोधन विभागात आंतरराष्ट्रीय कार्यक्रम विभागाचे समन्वयक म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली होती. तिथून परतल्यानंतर परदेशी यांना नव्याने नियुक्ती मिळाली असून नोव्हेंबरमध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या