लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: ओबीसींचे
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात येण्यास केंद्रातील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करून
काँग्रेसने मोदी सरकारला खोटारडे संबोधत मोदी यांच्या पुतळ्याची उपहासात्मक
पंचारती ओवाळत निदर्शने केली.
भाजपच्या सक्कर चौकातील आंदोलनानंतर
काँग्रेसच्या वतीने दिल्लीगेटला काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या
नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. ओबीसी आरक्षण रद्द
होण्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून काळे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी
केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च
न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय
आरक्षण संपुष्टात आले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ओबीसी
आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत.
केंद्र सरकारच्या ओबीसी जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून आज राजर्षी छत्रपती शाहू
महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने
केंद्रातील भाजप सरकारविरोधात आम्ही आंदोलन करत जनतेसमोर सत्य मांडण्याचे काम केले आहे.
आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार
आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे.
ओबीसी
आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी विरोधात दिशाभूल करणारे ढोंगी आंदोलन
करण्याऐवजी भाजप नेत्यांनी त्यांच्याच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनाच याबाबतीत
जाब विचारावा,’ असा टोलाही काळे यांनी लगावला.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज
गुंदेचा, उपाध्यक्ष खलील
सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस
नेते फारुक शेख, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते,
युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक
शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष
हनिफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विरेंद्र
ठोंबरे सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या