अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनं पुकारलं आंदोलन
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अकोले : एककीडे मराठा, ओबीसी, मागासवर्गीय
यांचा आरक्षणासाठी लढा सुरू असताना आता आदिवासी समाज सुद्दा आपल्या प्रश्नांसाठी
आक्रमक झाला आहे. आदिवासी आमदारांच्या घरावर मोर्चे काढून काळे झेंडे लावण्याचे
आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याची सुरुवात अकोले तालुक्यापासून झाली. तेथील आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या घरावर काळा झेंडा
लावून त्यांच्या पत्नीकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यभरात असे आंदोलन
करण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा
अध्यक्ष लकी जाधव यांनी दिली.
आदिवासींच्या समस्या सोडवण्यास राज्यातील
आमदार, खासदार अपयशी ठरले
असल्याचा आरोप करून त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन सुरू
करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याची सुरुवात अकोले तालुक्यातून झाली. राजूर येथे
आमदार लहामटे यांच्या घरावर मोर्चा नेण्यात आला. डॉ. लहामटे घरी नव्हते. त्यामुळे
त्यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये म्हटले आहे की, ‘आपण आदिवासींच्या आरक्षित जागेवर
निवडून आलेले आहात. तरीही तुम्ही आदिवासींचे प्रश्न सोडविणार नसल्यास आपल्याला
त्या पदावर राहण्याचा मुळीच आधिकार नाही. तुम्ही प्रश्नाला सामोरे जाण्याऐवजी
आम्हाला टाळून मुंबईला निघून जाता. त्याबद्दल तुमचा निषेध करून यापुढील निवडणुकीत
तुम्हाला आदिवासी समाज उत्तर देईल,’ असा इशाराही परिषदेतर्फे
देण्यात आला आहे.
जाधव म्हणाले
की, आता हे आंदोलन राज्यभर केले
जाणार आहे. प्रत्येक आदिवासी आमदारांच्या दारावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यांना
आदिवासींचे प्रश्न आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून बोगस आदिवासींनी बळकावलेल्या जागा
मोकळ्या करून खऱ्या आदिवासींची नोकरभरती करावी, पदोन्नतीत
आरक्षण विरोधी आदेश तात्काळ मागे घेण्यात यावा, धनगर व
आदिवासी जमात यांच्या सर्वेक्षणाचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल
सरकारने जाहीर करावा, महिलांसाठी दिशा शक्ती कायद्याची
तातडीने अंमलबजावणी करावी, आदिवासी क्षेत्रात धान, नाचणी, वरई लागवड कामाचा रोजगार हमी योजनेत समावेश
करावा, या मागण्यांसाठी आमदारांनी पावसाळी अधिवेशनात तसेच
यापुढे विधानसभेत मुद्दे उपस्थित करावेत, अशा मागण्या
करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात एकनाथ भोये, नीरज चव्हाण, संदीप गवारी, रमु इडे, मनीषा गाबले, रुखमिणी ठाकरे, बाळा पदवी, राजेंद्र घारे, धनाजी वाळू पुंदे, केशव रोंगटे, लक्ष्मण तळपे, संदीप गवारी, नीरज चव्हाण सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या