लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : करोना नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात
आलेल्या निर्बंधांचा मोठा आर्थिक फटका एसटीला बसल्याने एसटी प्रशासनाला
कर्मचाऱ्यांचा पगार देणे अवघड झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार वेळेत
मिळेनासा झाला असून शासनाने दिलेल्या निधीनंतर मे महिन्याचा पगार नुकताच गेल्या
आठवड्यात झाला. पगार मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीना
तोंड द्यावे लागत असून सध्याच्या परिस्थितीवरून पुढील महिन्यात तरी वेळेवर वेतन
मिळेल का?, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
करोनाच्या
दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले असले तरी
एसटीची अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालू होती. करोनाचा प्रादुर्भाव
वाढला असतानाही एसटीचे कर्मचारी आपली सेवा चोखपणे बजावत होते.
विशेष म्हणजे मागील
वर्षीच्या लॉकडाउनमध्ये देखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसेस
चालवल्या जात होत्या. त्यावेळी अनेक कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत
होते. अनेकांना करोनाने गाठले. तरीही कर्मचारी न डगमगता काम करत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना पगारही वेळेवर
मिळत नाही.
करोनाच्या निर्बंधामुळे एसटीच्या
उत्पन्नामध्ये प्रचंड घट झाल्याने खर्च भागवणे एसटी प्रशासनाला कठीण झाले आहे.
पगार कधी मिळणार, असे
म्हणण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. २०२०मध्ये तर मे महिन्याचा पगार ५० टक्के
देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड
नाराजी पसरली होती.
यंदाही प्रत्येक महिन्यामध्ये ७ तारखेला होणाऱ्या पगाराची
तारीख पुढे सरकू लागली आहे. आमची सेवाही अत्यावश्यक सेवेत मोडत असूनही पगारासाठी
प्रतीक्षा करावी लागत आहे, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू
आहे.
0 टिप्पण्या