लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी रात्रभर पावसाने झोडपून काढले. या जोरदार
पावसामुळे जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद
झाले आहेत. सकाळपासून पावसाची रिपरिप कायम आहे.
गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं पाच सहा दिवस
विश्रांती घेतली होती. मंगळवारी सायंकाळी नंतर हळूहळू पावसाची रिपरिप सुरू झाली.
बुधवारी पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. त्यानंतर रिमझिम पाऊस
सुरू होता. पण धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. गगनबावडा राधानगरी आणि आजरा
तालुक्यात अतिवृष्टी झाली.
बुधवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दणका दिला. रात्रभर
कोसळलेल्या या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे
४३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काल राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी बारा फुटांवर
होती. ती आता २७ फुटापर्यंत पोहोचली आहे. एका रात्रीत पाण्याची पातळी झपाट्याने
वाढल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले
आहेत. गारगोटी रोडवरील चंद्र फाटा शेळेवाडी येथे पुलाचे काम सुरू आहे, त्याला त्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. हा रस्ता जोरदार
पावसामुळे वाहून गेला.
राधानगरी ,तुळशी ,कासारी, कुंभी, पाटगाव, दूधगंगा या धरणक्षेत्रात रात्रभर अतिवृष्टी झाली. फाटकवाडी धरण पूर्ण भरले
असून इतर अनेक धरणातील पाणी पातळी वाढली आहे. पन्हाळा येथे सादोबा तळ्याजवळील
घराची भिंत पडली.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे
आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे. संभाव्य महापुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासकीय
पातळीवर पूर्ण तयारी करण्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या
प्रमाणात वाढ झाली असून काठावरील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
0 टिप्पण्या