Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्य सरकारचे आता 'मिशन ऑक्सिजन स्वावलंबन'; नगरचा प्लॅन तयार

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना आदेश







लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 अहमदनगर: करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता मिशन ऑक्सिजन स्वावलंबनहे अभियान हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंबंधी राज्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन त्यांना यासंबंधी सूचना केल्या. यामध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा तीन दिवसांचा साठा करण्यावर भर देण्यात येणार असून सर्व जिल्ह्यांना आपला कृती कार्यक्रम आखण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.


दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. बेडची संख्या वाढविण्यात आली होती, मात्र ऑक्सिजनची उपलब्धता कमी पडली होती. त्यामुळे आता सरकारने त्यावर भर देण्याचे ठरविले आहे. ज्या त्या जिल्ह्यांत आणि शहरांत ही सोय करण्यात येणार आहे. यातही वैद्यकीय वापराच्या लिक्विड ऑक्सिजनवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन उत्पादन करण्यासोबतच जास्तीत जास्त भर साठवणुकीवर देण्यात येणार आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले की, ‘नगर जिल्ह्याला २३० टन ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन नियोजन केले आहे. यामध्ये ७० टक्के लिक्विड, २० टक्के गॅस आणि १० टक्के रुग्णालयांत उभारण्यात आलेल्या प्लँटमधून ऑक्सिजन मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात १७ प्लॅंट उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील सहा ठिकाणी काम सुरू झाले आहे. ११ ठिकाणी पुढील आठवड्यात यंत्रणा येणार आहे. यासोबतच खासगी रुग्णालयांनाही साठवणूक क्षमता वाढविण्यास सांगण्यात येणार आहे. महापालिका ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या विचारात आहे, त्यांना त्याऐवजी साठवणूक यंत्रणा उभी करण्यास सांगण्यात आले आहे.'

डॉ. भोसले पुढे म्हणाले की, 'जिल्हा रुग्णालयातील साठवण क्षमताही वाढविण्यात येणार आहे. सर्व मिळून तीन दिवसांचा साठा कायम राखीव राहील, अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याशिवाय वाहतूक, नियोजन बंदोबस्त यासाठीही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ऑक्सिजन मिर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी करार करण्यात येणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत सर्व पूर्तता करून यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या २३० टन साठ्यापैकी ५० टक्के साठा नगर शहरात म्हणजे मुख्यालयात करण्यात येईल. उरलेला साठा तालुक्यांच्या ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या लाटेत जे अनुभव आले, त्यातून बोध घेत अडचणी येणार नाहीत, अशा पद्धतीने यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या