*नगरमध्ये एका महिलेला
किडनीचा म्युकरमायकोसिस हा दुर्मिळ आजार झाला होता.
*डॉक्टरांनी या रुग्णावर
यशस्वी उपचार केले आणि जीव वाचविला.
*किडनी विकार तज्ञ डॉ. आनंद काशिद यांनी ही शस्त्रक्रिया केली.
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर :- करोनाची दुसरी लाट ओसरत असताना काळ्या बुरशाच्या
(म्युकरमायकोसिस) रुग्णांच्या व्यथा समोर येऊ लागल्या आहेत. अहमदनगरमध्ये एका
महिलेला किडनीचा म्युकरमायकोसिस हा दुर्मिळ आजार झाला होता. डॉक्टरांनी या
रुग्णावर यशस्वी उपचार केले आणि जीव वाचविला. येथील किडनी विकार तज्ञ डॉ. आनंद
काशिद यांनी ही शस्त्रक्रिया केली.
करोना होऊन गेल्यानंतर काळ्या बुरशीची लागण होत असलेले
रुग्ण समोर येत आहेत. मात्र, याची लागण शक्यतो नाक, डोळे व मेंदूला होत असते.
मात्र, अहमदनगरला एका ५५ वर्षीय महिलेला चक्क किड्णीलाच काळ्या बुरशीची लागण झाल्याचे आढळून आले. हा दुर्मिळ प्रकार मानला जातो.
ही महिला करोनावर उपचार घेऊन घरी परतली
होती. एक महिन्यानंतर ताप, थंडीचा
त्रास होऊन पाठदुखी सुरु झाली. तपासणी केल्यानंतर त्यांना उजव्या किडनीमध्ये
काळ्या बुरशीची लागण झाल्याचे निदर्शनास आले. डॉ. काशिद यांनी त्यांना त्वरीत
रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला.
या रुग्णाला करोनामुळे
फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता, तर आता काळ्या बुरशीमुळे उजवी किडनी निकामी झाली होती. त्यातच रुग्णाला
मधुमेह असल्याने ही शस्त्रक्रिया करणे अधिक किचकट व गुंतागुंतीचे बनले होते. किडनी
विकार तज्ञ डॉ. काशिद, मधुमेह तज्ञ डॉ. अभिजीत शिंदे,
फुफ्फुस विकार तज्ञ डॉ.निलेश परजने, भूल तज्ञ
डॉ. पंकज वंजाळे, रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील नेमाणे यांनी सदर
रुग्णावर उपचार सुरु केले. डॉ. काशिद यांनी गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया करून
संपूर्ण किडनी काढून टाकली. आता रुग्णाच्या जीवाच्या धोका टळला असून प्रकृती स्थिर
आहे. रुग्णाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया मोफत केली.
0 टिप्पण्या