Ticker

6/Breaking/ticker-posts

'पवारांवर टीका करण्यासाठीच भाजपने पडळकरांना आमदार केले'

 







लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

नगर: ‘पवार कुटुंबीयांवर टीका करून ज्यांना आमदारकी मिळाली आहे आणि त्याच निकषावर ती अवलंबून आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणे चुकीचे आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपिनाथ पडळकर यांना टोला लगावला आहे. मी स्वत:ला कधीही मुख्यमंत्री समजत नाही. तरीही पडळकरांना याचा साक्षात्कार कसा झाला, याचा खुलासा त्यांनीच करावा,’ असे उत्तरही पवार यांनी आपल्यावरील टीकेला दिले.



भाजपआमदार पडळकर नुकतेच जामखेड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केले होते. रोहित पवार सेलिब्रिटी, मुख्यमंत्री असल्याच्या थाटात वावरत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर पवार आज कर्जत येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिले.
रोहित पवार म्हणाले, ‘माझ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या सर्वांचे मी नेहमी स्वागत करतो. पडळकर बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत, असे बोलले जाते. मग ज्या भाजपने मंडल आयोग लागू करण्यास कडाडून विरोध केला, त्या पक्षात ते कसे आहेत? त्यांच्या पक्षाची मंडल आयोगाची भूमिका त्यांनी आधी जाहीर करावी. सांगलीमध्ये त्यांचे एक भाषण खूप गाजले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते, जग इकडचे तिकडे झाले तरीही मी भाजपमध्ये जाणार नाही. मग आता ते भाजपमध्ये कसे गेले?'


ज्येष्ठ नेते 
शरद पवार आणि कुटुंबीयांवर सतत टीका केल्यामुळेच पडळकर यांना भाजपने आमदारपद दिले आहे. त्यांच्या याच कामगिरीवर ते अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. मात्र, त्यांनी सतत टीका करण्यापेक्षा कधी तरी विकास कामांवर बोलावे. त्यांनी स्वत:ही काय विकास केला, हेही सांगावे. मी स्वत:ला कधीही मुख्यमंत्री समजत नाही. तरीही पडळकर तसे म्हणत असतील तर त्यांना हा साक्षात्कार कसा झाला, हे त्यांनीच स्पष्ट करावे.


 मी आजही स्वतःला राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचा छोटा कार्यकर्ता असल्याचे समजतो. आजही कार्यकर्ता आहे, उद्याही कार्यकर्ता राहणार आहे. आपण लोकशाहीमध्ये राहतो. यामुळे जनता ठरवते कोण कोणत्या पदावर योग्य आहे. त्यामुळे मी स्वतःला कोणीही समजत नाही, ते काय समजतात ते माझ्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाही. त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रश्न सोडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही पवार यांनी पडळकरांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक अध्यक्ष नितीन धांडे, युवक शहर अध्यक्ष विशाल मेहत्रे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा सोनमाळी, डॉक्टर शबनम इनामदार, सतीश पाटील भास्कर भैलुमे, रज्जाक झारेकरीस दादा चव्हाण, बाबा भिसे, दीपक यादव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या