Ticker

6/Breaking/ticker-posts

अण्णा हजारेंचा तरुणांसाठी खास संदेश; म्हणाले.. ‘सायकल चालवा’..











 लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

राळेगणसिद्धी: 'वडापाव, मिसळ, पावभाजी, बर्गर, पिज्जा यासारखे हानीकारक फास्टफूड टाळा. तसेच पर्यावरण आणि शरारीला पूरक ठरणारीच सायकल चालवा,' असा संदेश ज्येष्ठ समाजसेवक  हजारे यांनी तरुणांना दिला.

हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी परिवाराने 'अभिवादन सायकल रॅली' आयोजित केली होती. या रॅलीमध्ये देशभरातून विविध ठिकाणच्या साडेबारा हजार सायकलस्वारांनी सहभाग घेतला. तब्बल अडीचलाख किलोमीटर एवढे अंतर सायकल चालवून हजारे यांना शुभेच्छा दिल्या. हजारे यांचे देशभर चाहते व कार्यकर्ते असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखी भेट देण्यात आली. आपण आहोत त्या ठिकाणी सायकल चालवावी व त्याची माहिती ऑनलाइन पद्दतीने राळेगणसिद्धीच्या कार्यालयात द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला देशभरातून प्रतिसाद मिळाला.

राळेगण येथूनही सायकल रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी हजारे यांनी सायकलस्वारांना शुभेच्छा देत सल्लाही दिला. हजारे म्हणाले, 'सायकल रॅली ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगला उपक्रम आहे. यात पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा यांचा वापर होत नसल्याने पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर उपक्रम असून यात व्यायाम पण होतो. त्यामुळे शरीर चांगले व निरोगी राहण्यास मदत होते. अशा उपक्रमांना माझा कायम पाठिंबा असेल.'


सायकल रॅली पारनेरला पोहचल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांनी सर्वांचे स्वागत केले. या 'अभिवादन सायकल रॅली' मध्ये सुरेश पठारे, दादा लक्ष्मण पठारे, कमल पंत, एकनाथ भालेकर, लाभेष औटी, दादा महादू पठारे, सुनिल हजारे, शामराव पठाडे, विनोद गोळे, शंकर नगरे, उदय शेरकर, गणेश भापकर, आकाश पठारे, सुशांतराजे देशमुख, स्वप्निल मापारी, अक्षय जाधव, नाना आवारी, हनुमंत पठारे, भूषण गाजरे, स्वप्निल पठारे, यश पठारे, सुशांत शिंदे आणि प्रणव गाजरे आदी सायकलस्वारांनी सहभाग घेतला. त्यांनी तब्बल ३७ किमीचा प्रवास करत अण्णांना वाढदिवसाची भेट दिली.

सायकल रॅलीमध्ये 'पाणी आडवा, पाणी जिरवा, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा' असा संदेश देण्यात आला.
सरपंच डॉ. धनंजय पोटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, डॉ. गणेश पोटे, पंकज तिकोणे, गणेश भोसले, डॉ. राहुल पोटे यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या