Ticker

6/Breaking/ticker-posts

ठाकरे सरकारविरुद्ध काँग्रेस मंत्र्याने थोपटले दंड!; 'त्या' GR मुळे पडली ठिणगी

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

 नागपूर: राज्य सरकारने गेल्या ७ मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जारी केलेला शासन निर्णय राज्यघटनेच्या तरतुदींचा भंग करणारा आहे. हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी सर्व स्तरातून राज्य सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे, अशी भूमिका मांडत राज्याचे ऊर्जामंत्री व अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी आपल्याच सरकारविरुद्ध आवाज उठवला आहे.

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध सर्व पातळीवर आंदोलन छेडण्याचा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या व्हीसीद्वारे झालेल्या बैठकीत करण्यात आला. डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना डॉ. राऊत यांनी शासन निर्णयाविरुद्ध आंदोलनाच्या गरजेवर भर दिला. पुढील काळात या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात याची मांडणी यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी केली. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात २००१ पासून प्रयत्न केले होते. याचा परिणाम म्हणून २००४ मध्ये तसा ठराव महाराष्ट्र विधानसभेने संमत केला होता. त्यानुसार २५ मे २००४ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयाला आव्हान देण्यात आले. या संदर्भात राज्य सरकारची विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्य सरकारने गेल्या ७ मे रोजी हा शासन निर्णय जारी केल्याने राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर गंडांतर आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेहमीच मागासवर्गीयांच्या हिताचा विचार केला आहे. काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र पाठवून मागासवर्गीयांच्या हितांचे रक्षण करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले होते. परंतु राज्य सरकारच्या पातळीवर तसे काहीच झाले नाही. यातून आता पुढील दिशा ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटून दलित समाजामध्ये पसरत असलेल्या असंतोषाची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. राऊत यांनी यावेळी सुचविले.

डॉ. राऊत यांनी चार सूत्री आंदोलनाची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगितले. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन भूमिका मांडणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून जीआर कसा घटना विरोधी आहे, हे पटवून देणे व जिल्हास्तरावर अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, अशा स्वरूपात हे आंदोलन व्हावे असे राऊत यांनी पुढे नमूद केले. या सूचनांना सर्वच नेत्यांनी सहमती दर्शविली. यावेळी माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पदोन्नतीतील आरक्षण हटविण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाची दलितांमध्ये असलेली प्रतिमा मलिन करण्यासाठी काही लोकांचा खटाटोप सुरू असल्याचे सांगितले. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच संपतकुमार यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या माध्यमातून या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा राहील, असे सांगितले. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रभारी मनोज बागडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई नगराळे, विजय आंभोरे आदी उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या