लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्रीगोंदा
:- तालुक्यात
पत्र्याच्या शेडमध्ये विना परवाना सुरू असलेल्या सॅनिटायझर बनविण्याच्या
कारखान्यावर पोलिसांनी छापा घातला. कारखाना चालविणाऱ्यास अटक करण्यात आली असून
तेथून २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कोणतेही तांत्रिक
ज्ञान आणि परवाना नसताना तेथे मोठ्या प्रमाणात सॅनिटाझर तयार करून विक्रीसाठी
दवाखाने, औषध दुकाने, कंपन्या या ठिकाणी पाठविण्यात येत होते.
या प्रकरणी पोलिसांनी विकास गुलाब तिखे
(रा. काष्टी ता. श्रीगोंदा जि. नगर) याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून जप्त
करण्यात आलेल्या साहित्याची आणि तयार केलेल्या सॅनिटायझरची तज्ज्ञांकडून तपासणी
करण्यात येत आहे. श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना या
कारखान्याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी अन्न व औषध प्रसाशन विभागाच्या
अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. औषध निरीक्षक अशोक राठोड व पोलिस पथकाने तेथे छापा
घातला. काष्टी ते तांदळी रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू
होता. विकास गुलाब तिखे हा कारखाना चालवित होता. ड्रममधील द्रव्याच्या मदतीने निळे
डाय (कलर) पाणी व इतर सोलुशन मिक्स करून हँण्ड सॅनिटायझर तयार केले जात होते.
त्यासंबंधीचे कोणतेही प्रशिक्षण अगर परवाना तिखे याने घेतलेला नसल्याचे आढळून आले.
त्याचेकडे सॅनिटायझर बनविण्याचे साहित्य
त्यामध्ये २०० लिटरचे प्रत्येकी ६ बॅरल, ३५ लिटरचे २० कॅन, ५ लिटरचे १०९ कॅन, चंचुपात्र, नरसाळे, गाळण,
प्रत्येकी १० बॉटलचे तीन मोठे बॉक्स, वेगवेगळ्या
फ्लेवर (सुगंधी) चार बॉटल, ५० मिलीच्या २५ स्प्रे बॉटल
स्टीकर, बिल बुक असे एकून २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला. औषध निरीक्षक अशोक राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा
पोलीस ठाण्यात तिखे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. रस्त्याच्या
बाजूला एका वस्तीजवळ शेतात हा कारखाना सुरू होता. त्याने तयार केलेले सॅनिटायझर
योग्य त्या मानकानुसार होते का, धोकादायक होते का, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. सध्या तरी त्याने विना परवाना ते
तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या