लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत : 'साहेब जरा तुम्ही
शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. माझी आता तेला-मीठाचीही अडचण आहे. आत्महत्या केली तर
मागे लहान-लहान मुलं आहेत,' असं म्हणत अहमदनगर जिल्ह्यातील
एका शेतकरी महिलेनं भाजप नेते आणि माजी मंत्री प्रा.
राम शिंदे यांच्यासमोर व्यथा मांडल्या आहेत. तसंच आपल्या वेदना मांडताना या
महिलेला रडूही कोसळलं.
कुकडी प्रकल्पातून नगर व सोलापूर
जिल्ह्याला पाणी सोडण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुणे जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात कालव्याला पाणी न
सुटल्याने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. आधीच करोना त्यात पाणी
न सुटल्याने शेती आणि दूध व्यवसाय अडचणीत आला आहे.
भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनी कर्जत
तालुक्यातील कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागाचा दौरा केला.
त्यांच्यासमोर व्यथा मांडताना शेतकरी महिलांना रडूच कोसळले. कर्जत तालुक्यातील
कोळवडी येथील शेतकरी महिला राधा संतोष फौंडे यांनी शिंदे यांच्यासमोर शेतकऱ्यांची
व्यथा मांडली.
आपली व्यथा मांडताना महिलेला रडू कोसळलं.
आधीच करोनाचं संकट त्यात कुकडीचं पाणी सुटलं नाही. त्यामुळे संकटात भर पडल्याचं ही
महिला सांगत आहे.
दूध व्यवसायासाठी कर्ज काढून गायी
पाळल्या. त्या आजारी पडल्या तेव्हा गळ्यातले दागिने मोडून उपचार केले. आता दुधाला
भाव नाही. कुकडीचं पाणी न सुटल्यानं चारा वाळून गेला. तिची ही समस्या सर्वांनाच
निरूत्तर करणारी होती. धीर धरा, एवढाच शब्द तिला सर्वजण देऊ शकले.
0 टिप्पण्या