लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नागपूर: करोना संसर्गाच्या धास्तीमुळे सर्वत्र लॉकडाउन लागले
आहे. त्याची झळ शहरांसोबतच ग्रामीण भागांनाही बसत आहे. या निर्बंधांचा थेट परिणाम
शेतीवर उपजीविका असलेल्यांवर झाला आहे. बाजारपेठांच्या मर्यादित वेळा आणि
लॉकडाऊनचा फायदा उठवून घाऊक व्यापाऱ्यांकडून भाव पाडून माल खरेदी केला जात आहे. त्यातून
वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं बाजारात नेलेला माल परत आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर
आली आहे.
हिंगणा तालुक्यातील शेतकरी देवराव घोडे
यांच्यावर आज अशीच वेळ आली. देवराव यांची हिंगणा तालुक्यात गुमगाव इथं शेती आहे.
यंदा त्यांनी आपल्या शेतात कलिंगडाचं उत्पादन घेतलं. आपली शेती शहरापासून जवळ
असल्यानं उन्हाळ्यात कलिंगडाला भाव येईल, अशी आशा त्यांना होती. पण त्यांची ही आशा फोल ठरली.
शेतात पिकवलेले कलिंगड घेऊन रविवारी ते
कळमना येथील घाऊक फळ बाजारात पोहोचले. हा माल बाजारात आणण्यासाठी आधीच त्यांनी
वाहतुकीपोटी १० हजार रुपये टेम्पो चालकाला मोजले होते. कलिंगड विकून चांगला भाव
मिळेल, असं त्यांना वाटत
होतं. बाजारात आल्यानंतर मात्र त्यांना मोठा धक्का बसला. व्यापाऱ्यानं त्यांच्या
कलिंगडाला प्रतिकिलो ८ रुपयांचा दर दिला आणि मजुरीसह १२ हजार ४०० रुपयांची पावती
त्यांच्या हातात दिली. त्यातून वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं देवराव यांना
कलिंगडांनी भरलेला टेम्पो आल्यापावली परत घेऊन जाण्याची वेळ आली.
देवराव घोडे यांच्याप्रमाणेच तालुक्यातील इतर फळ-भाजीपाला शेतकऱ्यांची स्थिती आहे. इतक्या कमी दरामुळे कलिंगडाच्या शेतीसाठी एकरी केलेला उत्पादन खर्च भरून निघणंही कठीण झालं आहे. बाजारात आणलेला माल परत घेऊन जाणं देखील परवडत नसल्यानं मिळेल त्या मातीमोल दरांमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
0 टिप्पण्या