*नगर शहरातील करोना बाधितांचा आकडा
कमी होईना.
*शहरातील कडक लॉकडाऊन आणखी पाच दिवस
वाढवला.
*भाजीपाल्याची
दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश.
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: अहमदनगर शहरात दहा दिवस कडक निर्बंध
लागू करूनही रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आणखी पाच
दिवस हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १५ मे रोजी सकाळी सातपर्यंत औषध दुकाने,
दूध वगळता अत्यावश्यक सेवेतील इतर दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश
महापालिका आयुक्त शंकर
गोरे यांनी दिला आहे. दरम्यान, भाजीपाला
पुरवठ्यासंबंधी याहीवेळी शेतकरी आणि ग्राहकांचा विचार करण्यात आलेला नाही.
राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधाच्या
दुसऱ्या टप्प्यातही नगर शहरात रुग्णवाढ सुरूच होती. त्यामुळे १० मे पर्यंत कडक
निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळातही अपेक्षित फरक पडल्याचे दिसून आले नाही.
काल महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांच्यासह मनपा
आधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये निर्बंधाची मुदत वाढविण्याचे ठरविण्यात आले.
त्यानंतर आयुक्तांनी हा आदेश दिला.
कडक निर्बंध लागू असले तरी रस्त्यावरील
गर्दी कमी झालेली नाही. सर्व व्यवहार बंद असले तरी रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे.
पोलीस अधून मधून कारवाई करतात, विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी करण्याचा निर्णय झाला, तरीही
फिरणाऱ्यांमध्ये फारसा फरक पडला नाही. मुख्य म्हणजे शहरात लसीकरणासंबंधी खूप
तक्रारी आहेत. यासाठी होणारी गर्दीही संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याची
शक्यताही व्यक्त होत आहे. लशीचा तुटवडा आहेच, पण नियोजनाचा
अभाव असल्याने लसीकरण केंद्रांवर रोजच गर्दी होत आहे.
दरम्यान, भाजी विक्री
संबंधीचा गोंधळही कायम आहे. शहरातील भाजीपाला वितरण सुरळीत व्हावे व शेतकऱ्यांचे
नुकसान होऊ नये, यासाठी मनपाने थेट शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी
करून ती वितरित करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेतर्फे
करण्यात आली होती. आयुक्तांनी आत्मा या संस्थेशी बोलून हा प्रश्न मार्गी लावण्याचे
आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र, यावर अद्याप तोडगा
निघालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी चोरून भाजी विक्री केली जात असल्याचे तर कोठे
विक्रेत्यांना कारवाईला समोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. गेले दहा दिवस
नागरिकांनी कशीबशी गुजरण केली असली तरी आता वाढीव काळात भाजीपाल्यासाठी नागरिकांचेही
हाल होण्याची शक्यता आहे. असेच कडक निर्बंध लागू करताना अन्य शहरांतील
महापालिकांनी भाजीपाला वितरणाची सोय केली आहे. नगरमध्ये मात्र, महापालिकेने ही जबाबदारी पूर्णपणे झटकली असून यात शेतकऱ्यांचे नुकसान आणि
नागरिकांचेही हाल होत आहेत, असा आरोप किसान सभेचे भैरवनाथ
वाकळे यांनी केला आहे.
काय राहणार बंद :
*किराणा दुकाने, संबंधित मालाची खरेदी-विक्री
*भाजीपाला खरेदी-विक्री
*सर्व खाजगी आस्थापना
*अंडी, मटण, चिकन व मत्स्य विक्री
काय राहणार सुरू :
*वैद्यकीय सेवा, औषधाची दुकाने
*अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप
*घरपोच गॅस वितरण सेवा
*सर्व बँका, वित्तीय संस्था
*दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- फक्त
सकाळी ७ ते ११
*पशुखाद्य विक्री- सकाळी ७ ते ११
0 टिप्पण्या