प्रशासनाला अजून किती मृत्यू हवेत ? ग्रा.प.सदस्य सीमा मडके यांचा उद्विग्न सवाल
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
शेवगाव (जगन्नाथ गोसावी) :-ठाकूर निमगाव (ता.शेवगाव) येथे कोरोना संसर्गाने अक्षरशः विळखा घातला आहे. दहा दिवसात १५ निष्पाप ग्रामस्थांचे बळी गेले आहेत. कोरानाची बाधा झालेले १०० रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
कोरोनाला थोपविण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सध्या येथे जनता कर्फ्यू आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. ठाकूर निमगावमध्ये प्रशासनाला आणखी किती बळी हवेत ? असा उद्विग्न सवाल ग्रां.प.सदस्य सौ.सीमा मडके यांनी राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना विचारला आहे.
ना.टोपे व सर्व संबंधितांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात सौ.मडके यांनी म्हटले आहे की, ठाकूर निमगावमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती व घबराटीचे वातावरण आहे. येथे रुग्ण वाढीबरोबरच मृत्यूदरही अधिक आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने वेळोवेळी तहसीलदार अर्चना पागिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी यांचे लक्ष वेधून उपाययोजनांची मागणी केली. मात्र, महसूल व आरोग्य या दोन्ही यंत्रणांनी कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानली. परिणामी, दहा दिवसात १५ निष्पाप ग्रामस्थांचे हकनाक बळी गेले. ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर आरटीपीसीआर व रॅपिड अँन्टीजेन टेस्टबरोबरच ग्रामस्थांचे लसीकरण करण्याचीही मागणी केली. मात्र, टेस्टींग किट उपलब्ध नसल्याचे कारण देत तालुका प्रशासन टोलवाटोलवी करत आहे.
सध्या येथील सुमारे १०० रुग्ण विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांसाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरणाची सोय केली आहे. लोकवर्गणीतून रुग्णांना नाश्ता, चहापाणी व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आल्याचे सौ.मडके यांनी सांगितले.
दरम्यान, दुपारी उशिरा आरोग्य विभागाने ग्रामस्थांची आरटीपीसीआर टेस्टिंग सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
0 टिप्पण्या