लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: देशात निर्माण झालेल्या
करोनाच्या भीषण परिस्थितीवरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतापासून जगाला धोका असल्याची चिंता आता
युनिसेफनेही व्यक्त केली आहे. करोना ज्या वेगाने भारतात पसरत आहे त्यापासून
संपूर्ण जग संकटात येईल. त्यामुळे भारताला करोनाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांनी
मदत जास्तीत जास्त मदत करावी असे युनिसेफतर्फे सांगण्यात आले आहे.
राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या भारतावर ही वेळ
आली असून सन्माननीय पंतप्रधान महोदय २० हजार कोटींचा महत्वाकांक्षी सेंट्रल विस्टा
प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. दिल्लीत नवे संसद भवन, त्यात
पंतप्रधानांचा नवा कोरा महाल असा या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे व त्याच
देशाने बांगलादेश, भूतान, श्रीलंकासारख्या
देशांकडून करोना निवारणासाठी मदत स्वीकारायची, याची खंत वाटू
नये याचे आश्चर्य वाटते असे शिवसेनेने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालय करोनाप्रकरणी रोज
केंद्र सरकारला चाबकाने फोडून काढत आहे. एखादे संवेदनशील किंवा राष्ट्रभक्त सरकार
असते कर राजकीय फायद्या-तोट्याचा विार न करता सर्वच पक्षांच्या प्रमुखांचे एक
राष्ट्रीय पथक बनवून या संकटाशी कसे लढायचे यावर सल्लामसलत केली असती. पण पश्चिम
बंगालात एका राज्यमंत्र्याच्या गाडीवर दगड पडल्याच्या बहाण्यात केंद्र सरकार गुंग
झाले आहे. करोनाचे संकट इतके गहिरे आहे व सर्वोच्च न्यायालयाचे चाबूक इतके जोरात
पडत आहेत की, त्यामुळे
सरकारचे पुरते वस्त्रहरण झाले आहे, अशा शब्दात शिवसेनेने
सरकारचे वाभाडे काढले आहे.
'भारत नेहरू-गांधी यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर तग धरून आहे'
शिवसेनेने सामना या मुखपत्रातील अग्रलेखाद्वारे हा निशाणा साधला आहे. बांगलादेशने भारताला १० हजार रेमडेसिवीर वायल्स देणगी दाखल पाठवले. भूतानसारख्या देशाने ऑक्सिजन पाठवला. नेपाळ, म्यानमार, श्रीलंकासारखे देशही आत्मनिर्भर भारताला मदतीचा हात पुढे करीत आहेत. स्पष्ट सांगायचे तर आजही भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर. नाहीतर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते, असे अग्रलेखात म्हटले आहे.
भारतातील पेटलेल्या चितांचा धूर आजूबाजूच्या देशांना गुदमरून टाकत आहे. या धुरातून कोरोना आपल्या देशात पसरू नये यासाठी अनेक गरीब देशही भारताला दयाबुद्धीने मदत करू लागले आहेत. कधीकाळी ही वेळ पाकिस्तान, रवांडा, कोंगोसारख्या देशांवर येत असे. आज राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या भारतावर आल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या