लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना करोना काळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या
शनिवारपासून (दि. २२ मे) सुरू होत आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे
सादर करण्याची गरज नाही. रिक्षाचालकांनी ऑनलाइन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक,
अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक
प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दीड
हजारांची मदत तात्काळ जमा केली जाईल. यासंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच मंत्रालयात
झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे.
करोना संकटकाळात रिक्षाचालकांना दीड हजार
रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणी
करण्यासाठी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘आयसीआयसीआय’ बँकेतर्फे
स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर परवानाधारक रिक्षाचालकांना
२२ मे पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. कोणतीही कागदपत्रे सादर न करता संगणक
प्रणालीवर वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार
क्रमांकांची माहिती भरल्यानंतर, पडताळणी होऊन
रिक्षाचालकांच्या खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा होणार आहे. परिवहन
विभागाने यासंदर्भातील तयारी पूर्ण केली आहे.
रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्यासाठी
आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला असून ज्या रिक्षाचालकांचे आधार
क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्वरित जमा
होणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. ही
स्थिती लक्षात घेत करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लादण्यात
आले आहेत. याची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्यात
रिक्षाचालकांनाही अर्थसहाय्य केले जाणार असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसारच
पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या