लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: राज्यातील
करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने मोठ्या प्रमाणत लसीकरण (Corona
Vaccination) मोहीम हाती घेतली आहे. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील
नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ देण्यात येत आहे. लसीकरणासाठी आरोग्य सेतू अॅप किंवा
को-विन संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र इतर जिल्ह्यातील तरुण
लसीकरणासाठी शेजारच्या जिल्ह्यात नोंदणी करत असून लसीकरणाला गैरहजर राहत असल्याने
अनेक लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाहणीत समोर आलं आहे.
राज्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला
तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मात्र लसीकरणासाठी नोंदणी करताना आरोग्य
सेतू अॅप असो की को-विन संकेतस्थळ बघाल तेव्हा, बघाल तो स्लॉट बुक दिसत असल्याने मोठ्या प्रमाणत लसीकरण
रखडले आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी फक्त ऑनलाईन नोंदणीच ग्राह्य धरली जात
असल्याने नवीन अडचण निर्माण झाली आहे.
या संदर्भात माहिती देताना जिल्ह्यातील
धामणगांव गढी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण अधिकारी डॉ. पुनम मोहोकार सांगतात
की, १८ ते ४४ वयोगटातील
लसीकरणाला तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने
प्रत्येक दिवशी १०० टक्के बुकिंग लिस्ट को-विन संकेतस्थळाकडून आम्हाला प्राप्त
होते. त्यानुसार आम्ही लसीकरणाचे नियोजन करतो.
मागील १० दिवसांमध्ये इतर जिल्ह्यातून
लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यात अनेक नागरिक ग्रामीण
भागातील लसीकरण केंद्रावर गर्दी कमी असेल या अनुषंगाने बुकिंग करतात. मात्र
बहुतांश नागरिक नोंदणी करुन सुद्धा गैरहजर राहत आहेत. यामुळे लसीकरणाचे डोस शिल्लक
राहत आहेत. दुसरीकडे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करुन लसी
देण्याची परवानगी नसल्याने अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
या संदर्भात नाव न छापण्याच्या अटीवर ‘मटा’शी बोलताना एक
वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, संकेतस्थळावर अपॉइंटमेंट
घेताना वेटींग लीस्ट असल्यास दररोज देण्यात येणारे डोस पडून राहणार नाही. लसीकरण
केंद्रावर शिलकी डोस वितरण करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा उपयोग केल्यास ज्या
लोकांकडे मोबाईल नाही त्यांनाही लसीकरणाचा लाभ घेता येईल. बुकिंग करुनही गैरहजर
राहणाऱ्या लाभार्थ्यांला फक्त दुसऱ्या आठवड्यात लसीकरणाची संधी द्यावी. या सर्व
गोंधळाच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी या बाबींचा अवलंब केल्यास लसीकरण प्रक्रिया
सुलभ होवून कमी वेळेत अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य गाठता येणार आहे.
0 टिप्पण्या