लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कोविन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करताना कोणतेही केंद्र निवडण्याची मुभा आहे. शहरातील केंद्रांवर तत्काळ नोंदणी होऊन स्लॉट संपतात. शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत लसही कमी असते. त्यामुळे नोंदणी करताना अनेक नागरिक ज्या केंद्रावर लस उपलब्ध दिसत आहे, ते केंद्र निवडतात. त्यामुळे शहरातून ग्रामीण भागात जाऊन लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे स्थानिकांना वंचित रहावे लागत असल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे. संताप व्यक्त होण्याच्या दोन घटना आज नगर जिल्ह्यात घडल्या.
पाथर्डीत युवा मोर्चाची गांधीगिरी
पाथर्डीत जिल्हा परिषद शाळेत असलेल्या लसीकरण केंद्रावर
बाहेरून काही नागरिक आले होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने त्यांना
पुष्पगुच्छ देत गांधीगिरी करण्यात आली. उद्यापासून कृपया पाथर्डी तालुक्याच्या
लसीकरण केंद्रावर नाव नोंदणी करू नका, असे आवाहन करण्यात
आले. नाव नोंदणी असली तरीही आम्ही तुम्हाला लस घेऊ देणार नाही, परत पाठवू, असा इशाराही मुकुंद गर्जे यांनी यावेळी
दिला.
लस मिळत नसल्याने यापूर्वी भाजप युवामोर्चाचे जिल्ह्या उपाध्यक्ष अमोल गर्जे व सामाजिक कार्यकर्ते मुकुंद
गर्जे यांनी लसीकरण केंद्रावर आंदोलन करून लसीकरण बंद केले होते. तालुक्याबाहेरून
काही नागरिक आल्याचे कळाल्यावर गांधीगिरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार पंकज
नेवसे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, सहाय्यक पोलीस
निरीक्षक परमेश्वर जावळे हेही लसीकरण केंद्रावर उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना
आवाहन केले की, सर्वांनी आपल्याच जिल्ह्यात, तालुक्यात स्वतःचा गावात लस टोचून घ्यावी.
0 टिप्पण्या