Ticker

6/Breaking/ticker-posts

वर्दीतील माणूसकी : तरुणाईच्या लसीकरणापूर्वी जामखेड पोलिसांनी केले 'हे' काम

 









लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: लॉकडाउनच्या काळात पोलिसांबद्दल काही खरे तर काही कथित मेसेज व्हायरल होत आहेत. गर्दी हटविण्यासाठी चालविलेली लाठी असो, वेगळ्या पद्धतीची शिक्षा असो की अन्नदानासारखे उपक्रम असो, त्यांची चर्चा होत आहे. जामखेड पोलिसांनी आता याही पुढे जाऊन सामाजिक भान जपणारा उपक्रम घेतला आहे. तरुणाईच्या मदतीने जामखेडमध्ये आज (१ मे) पोलिसांनीच रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. घोषणेप्रमाणे आज लसीकरण सुरू झाले नसले तरी तरुणाईची पावले मात्र या शिबिराकडे पडताना दिसत आहेत.

करोनाचा प्रकोप वाढत असताना रक्ताचा तुडवडाही जाणवू लागला. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. आता १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे अर्थातच तरुणाईचेही लसीकरण होणार आहे. करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. रक्तदानासाठी साधारणपणे तरुणाईवरच रक्तपेढ्या अवलंबून असतात. त्यांचे लसीकरण झाल्यावर रक्त संकलानावर परिणाम होणार असल्याने लसीकरणापूर्वी रक्तदान करा, ही मोहीम सुरू झाली आहे.


अन्य संस्था, संघटनाप्रमाणेच जामखेड मध्ये खुद्द पोलिसांनीच असे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र दिनी जामखेडमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक पोलिसांनी स्वत: रक्तदान केले. त्यानंतर शहर आणि तालुक्यातून मोठ्या संख्येने तरुण रक्तदानासाठी येत आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन निरीक्षक गायकवाड यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला संपूर्ण तालुक्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सकाळपासून जामखेड परिसर आणि तालुक्यातील युवकांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली आहे.



वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्त लावण्याचे काम करणाऱ्या पोलिसांनीच एखाद्या स्वयंसेवी संस्थेप्रमाणे मदतीचा हात पुढे करून आयोजित केलेल्या या शिबिराची चर्चा सुरू आहे. एका बाजूला संचारबंदीच्या नियमांची अंमलबजावणी करीत दुसरीकडे रक्तदान शिबिराच्या आयोजनातही पोलिस व्यस्त असल्याचे दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या