Ticker

    Loading......

रुग्णसेवेत राजकारण नको; फडणवीसांसह भाजप नेत्यांना गडकरींच्या कानपिचक्या

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नागपुर:-पंथ, पक्ष, धर्म, जात विसरून सध्या रुग्णांना मदत करा. कठीण काळ आहे. थोडी मदत केली तर बोर्ड आणि झेंडे लावायची गरज नाही. सेवेचे राजकारण करणे लोकांना तसेही आवडत नाही. कोणताही पक्षभेद न करता सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्या. लोक ही सेवा लक्षात ठेवतील, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी भाजप महानगर कार्यकारिणी बैठकीच्या सांगताप्रसंगी केले. ऑनलाइन ही बैठक झाली.

माझ्यात अँटीबॉडिज तयार आहेत. मला काही होत नाही, अशा फाजिल आत्मविश्वासात राहू नका. आपला प्रत्येक कार्यकर्ता देवदुर्लभ आहे. त्यांना गमावून चालणार नाही. देशकार्य होईल, मात्र आधी स्वत:ची काळजी घ्या, अशी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, असे गडकरी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नुकतेच गडचिरोलीला जाऊन आले. खूप गरजेचे असेल तर जायला हवे, मात्र गाडीत किती लोक बसतात, लोकांमध्ये किती मिसळायचे याचा फेरविचार करावा. शक्य ती कामे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करा. आज मोबाइलमध्येही व्हिडिओची सोय आहे. महापौर दयाशंकर तिवारी, मोहन मते हे आपल्याला काही होणारच नाही या अविर्भावात वावरत होते. तसे करू नका, अशी सूचना गडकरींनी केली.


या भाषणात त्यांनी मध्य नागपुरातील कन्हेरे, कन्हय्या कटारे आणि छोटू बोरीकर या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. या कार्यकर्त्यांनी ऑक्सिजन सिलिंडर गोळा करून योग्य उपाययोजना कशी करायची याचे प्रशिक्षण घेतले. लोकांचे जीव वाचविले. त्यांच्यासारखे पंचेवीस कार्यकर्ते निर्माण झाले तर समाजाला मोठी मदत होईल.

चांगल्याचा विचार आणि वाईटाला तोंड देण्याची तयारी हवी. कोव्हिडचे साइड इफेक्ट्स सुरू आहेत. सध्याच्या इस्पितळातच बेड्स वाढविणे अधिक बरे. आपल्या भागातील खासगी डॉक्टरांना काही मदत हवी असल्यास माझ्याकडे पाठवा. हवेतून तयार होणारा ऑक्सिजन आणि स्टील फॅक्टरीमध्ये होतो तो लिक्विड ऑक्सिजन असे दोन प्रकार आहेत. आपण नागपुरातून विदर्भात ऑक्सिजन पाठवित आहोत. पन्नास बेड असणाऱ्यांनी हवेतून ऑक्सिजन तयार करणारे प्लान्ट करावेत. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन, औषधे आणि इस्तितळांचा तुटवडा पडणार नाही असे काम आपण करून दाखवू, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या