लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
सध्याच्या करोना काळात
दुर्लक्षित असलेल्या श्वासप्रश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आलेय. श्वास जो आपल्या
जन्मापासून सोबत आहे, तो इतका सहज आहे, की श्वास घेण्यासाठी वेगळे कष्ट
घ्यावे लागत नाहीत. श्वसनाची वेगळी जाणीव होत नाही; परंतु आज
जेव्हा प्रत्येक श्वास महत्त्वाचा झाला आहे, त्या वेळेस
श्वसनाबाबत आत्मावलोकनाची वेळ आली आहे.
प्राणायाम करताना आसनस्थितीचा अभ्यास
प्राणायाम करताना पद्मासनामध्ये बसावे, असे योगग्रंथात लिहिलेले आहे. यामध्ये
दोन्ही पाय एकमेकांमध्ये गुंतले जातात, ज्यामुळे कमरेपासून
पाठीचा कणा ताठ होण्यासाठी मदत होते.
कुठल्याही प्रकारचा प्राणायाम किंवा
ध्यानधारणा या सर्वांमध्ये विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. जी
ऊर्जा शरीरामधील झीज भरून काढण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, आपले विचार शुद्ध
करण्यासाठी, मन स्थिर ठेवण्यासाठी आणि योगी लोकांसाठी षटचक्र
जागृत करण्यासाठी उपयुक्त असते. ही ऊर्जा शरीराबाहेर पडू नये म्हणून योगामध्ये ‘बंध’अभ्यास सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे शरीरातील
तळहात आणि तळपायामधू आपली ऊर्जा जमिनीच्या दिशेने प्रवाहित होऊ शकते आणि म्हणून
पद्मासनाचा अभ्यास प्राणायामामध्ये विशेष करून सांगितलेला आहे; कारण पद्मासनामध्ये पायाचे तळवे नेहमी जमिनीकडे असतात, ते वरच्या दिशेने येतात.
हाताची स्थिती
प्राणायाम करताना दोन्ही हात कोपरात सरळ
ठेवून, तळहात गुडघ्याच्या
बाहेर, जमिनीच्या दिशेने वेगवेगळ्या मुद्रांमध्ये ठेवले
जातात; परंतु हात कोपरात वाकवून तळहात गुडघ्यावर ठेवावेत.
यामुळे खांद्यापासून छातीचा वरचा भाग आणि बरगड्यांमध्ये हालचाल होण्यास मदत मिळते.
या स्थितीत तळहात वरच्या दिशेला स्थिर होतात. अशा पद्धतीने तळहातामधून आणि
तळपायांमधून शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा बाहेर न पडता, ती
शरीराच्या आत कार्यरत होते.
प्राणायाम करताना योगा मॅट किंवा एखादे
आसन घेऊन बसावे. शरीरातली ऊर्जा जमिनीत निघून जाऊ नये (अर्थिंग) हाच त्यामागे हेतू
आहे. आज आपण पाहणार आहोत कपालभाती, कपालभाती ही श्वसनमार्ग मोकळा करणारी क्रिया आहे. लोहाराच्या भात्याप्रमाणे
श्वासप्रश्वास शीघ्र गतीने करणे यास कपालभाती म्हणतात. कपालभातीमुळे फुफ्फुस आणि
वायुकोश शुद्ध केले जातात. कपालभातीच्या शीघ्र हालचालीमुळे उष्णता निर्माण होते;
त्यामुळे कफ्ज तसेच वायूजन्य विजातीय दूर केले जातात. वायुकोशात
साठून राहिलेला श्वास हा बाहेर पडण्यास मदत होते.
जेव्हा आपण कामानिमित्त एका जागेवर बसतो, त्या वेळेस हळूहळू पाठीला पोक काढून
पुढं झुकून बसतो. छातीचा भाग हा पोटावर दाबून आपण बसलेलो असतो. त्यामुळे
श्वासपटलाला पुरेशी हालचाल करून दीर्घ श्वसन करणे अवघड जाते; तसेच बॅड पोश्चरमुळे छातीचा पिंजरा रुंदावणे आणि आकुंचित होणे ही क्रिया
मर्यादित झाल्यामुळे आपले श्वसन उथळ (शॅलो ब्रिदींग) बनते. दीर्घ श्वास बाहेर पडला,
तरच उत्तम प्रकारचा श्वास शरीराच्या आत येऊ शकेल. असे न झाल्याने
शरीरातील कार्बन डायऑक्साइड आणि त्याज्य वायू बाहेर पडत नाहीत आणि शरीराला पुरेसा
प्राणवायू मिळत नाही. शरीरात सीओटूचे प्रमाण वाढले, तर अॅसिडिटी,
डोकेदुखी, निरुत्साह, उदासीनता,
डिप्रेशन येऊ शकते. कपालभातीद्वारे जास्तीत जास्त उच्छ्वास
ताकदीनिशी बाहेर फेकण्याचा प्रयत्न आपण करतो.
कृती
पद्मासनात स्थिर बसावे. पद्मासन जमत नसेल, तर वज्रासन किंवा खुर्चीवर बसा. एक
श्वास घ्यावा आणि श्वास सोडताना पोट आत खेचून जोरात नाकाने श्वास बाहेर फेकावा.
परत एक श्वास घ्यावा आणि तो श्वास जोरात नाकाद्वारे बाहेर फेकावा. अशा प्रकारे
नवीन क्रिया करणाऱ्या व्यक्तींनी प्रथम पाच श्वास, दहा श्वास
या क्रियेचा सराव करावा. हळूहळू १० श्वासाचे दोन किंवा तीन आवर्तन करावेत. हळूहळू
पन्नास ते शंभर श्वास करण्याचा प्रयत्न करावा.
नवीन सुरुवात करत असताना जोरात श्वास
बाहेर फेकल्यामुळे दमायला होते. त्यामुळे हळूहळू आपला श्वास वाढवत कपालभातीची
क्रिया वाढवायची आहे. कोव्हिडमधून बाहेर पडलेल्या व्यक्तीनेही याच पद्धतीने
कपालभाती करावी. हार्ट पेशंट किंवा बायपास झालेल्या व्यक्तीने कपालभातीचा जोर
बराच कमी ठेवावा. काहींना सकाळी शिंकांचा त्रास होतो. अनेकांना बारा महिने सर्दी
असते किंवा डोकेदुखीचा त्रास या सर्वांसाठी कपालभाती उपयुक्त आहे.
0 टिप्पण्या